सॅटेलाइट फोटोतून खुलासा : युक्रेनची राजधानी कीवजवळ 64 किमीपर्यंत पसरले रशियन सैन्य

रशिया-युक्रेन युद्धाला पाच दिवस पूर्ण झाले असून या पाच दिवसांमध्ये रशियन फौजांनी युक्रेनवर जोरदार हल्ला चढवला आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे मोठं नुकसान झालं आहे. रशियन हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. युद्ध सुरू असताना सॅटेलाइट छायाचित्र समोर आले आहे. राजधानी कीव्हमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या रशियन फौजा यामध्ये दिसत आहे.
युक्रेनवर रशियाच्या ताज्या हल्ल्यांदरम्यान, घेतलेल्या सॅटेलाइट फोटोंमध्ये असे दिसून आले आहे की युक्रेनची राजधानी कीवच्या उत्तरेस 64 किलोमीटर अंतरावर रशियन लष्करी काफिला तैनात आहे. मात्र आदल्या दिवशी असे सांगण्यात आले होते की रशियन सैन्याचा काफिला 27 किलोमीटर लांब पसरला आहे. कीववर यापूर्वीच अनेक हल्ले झाले आहेत आणि ते रशियन हल्ल्यांचा प्रतिकार करत आहेत.
अमेरिकन स्पेस टेक्नोलॉजी कंपनी मॅक्सरने प्रसिद्ध केलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये अँटोनोव्ह विमानतळ ते प्रिबिर्स्क शहरापर्यंतचा रस्ता व्यापणारा रशियन लष्करी काफिला दाखवला आहे. इव्हांकिवच्या उत्तर आणि वायव्येस, जिथून काफिला जात आहे, तेथे अनेक घरे आणि इमारती जळताना दिसत असल्याचे मॅक्सर कडून सांगण्यात आले आहे.





