Satara : कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या स्वागतासाठी सातारानगरी सज्ज

सातारा : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सातारा शहरात प्रथमच आगमन होत आहे. जिल्ह्याच्या हद्दीवर सारोळा पुलावर बाबाराजेंचे स्वागत करण्यासाठी हजारो राजे समर्थक रविवारी सकाळी रवाना होत आहे. नवनियुक्त मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या स्वागतासाठी सातारा शहर सज्ज झाले आहे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
सातारा जिल्ह्याला यंदा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच चार कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, आणि आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे विविध खात्यांची धुरा सोपवली जाणार आहेत. नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपवून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे रविवारी दुपारी सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. त्यांच्या स्वागताची भव्य तयारी बाबाराजे समर्थकांनी केली आहे. पुणे व सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर सारोळा येथे नीरा नदी पुलावर त्यांचे भव्य स्वागत भव्य पुष्पहार घालून करण्यात येणार आहे तेथून वाहनांची रॅली काढण्यात येणार असून तो भव्य ताफा टप्प्याटप्प्याने येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये पोहोचणार आहे.
शिरवळ ते सातारा यादरम्यान बाबाराजेंचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये 3000 कार्यकर्त्यांची दुचाकी रॅली काढण्यात येणार असून भव्य रॅलीसह शिवेंद्रसिंहराजे हे शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर जाणार आहेत. तेथे स्व. अभयसिंह राजे उर्फ दादा महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली शेंद्रे सोनगाव जकातवाडी बोगदा मार्गे सातारा शहरात येणार आहे.
सातारानगरी शिवेंद्रराजेमय
समर्थ मंदिर राजवाडा व तेथून सुरुची येथेही रॅली पोहोचणार आहे. सातारा शहरात ठिकठिकाणी भव्य मांडव उभारण्यात आले असून बाबाराजे यांच्या अभिनंदनाचे फुलक झळकू लागले आहेत. त्यांच्या स्वागताची भव्य तयारी बाबाराजे समर्थकांनी केली आहे. संपूर्ण सातारानगरी ही शिवेंद्रराजेमय होऊन गेली आहे काही ठिकाणी शिवेंद्रसिंहराजे यांची पेढेतुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.





