Satara : शंभर दिवसांच्या कृती आराखड्यावर झेडपीचा फोकस

सातारा : सातारा जिल्हा परिषदेकडून १०० दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून त्यानुसार जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ नव्याने अपडेट करण्यात येत आहे. आठवड्यातील मंगळवारी व बुधवारी क्षेत्रीय कार्यालयांना अधिकारी भेटी देवून पाहणी करणार आहेत.
सर्व गटविकास अधिकारी प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या व चौथ्या सोमवारी सातारा जिल्हा परिषदेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या आदर्श शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाड्यांचा आढावा घेवून प्रकल्पाची वस्तुस्थिती समजून घेणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या पुढाकाराने शंभर दिवसांच्या कृती आराखडयावर प्रशासनाचा फोकस दिसून येत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील सर्व कर्मचाऱ्यांनी दुपारी ४ ते ६ या वेळेत व प्रत्येक शनिवारी अभिलेख कक्षातील अभिलेख वर्गीकरणाचे, कार्यालयीन स्वच्छतेचे कामकाज करावे. कार्यालय आवारातील जुनी व वापरात नसलेल्या वाहनांचे निर्लेखन करावे. कर्मचारी व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी. तसेच प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवावीत.सुसज्ज प्रतिक्षालय असावे. कार्यालयामध्ये सुव्यवस्थित नामफलक व दिशादर्शक फलक असावेत. दिव्यांगाना रॅम्पची सोय करावी. केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाच्या प्रकल्पांना समक्ष भेटी देवून त्यांच्या अंमलबजावणी व प्रगतीची पाहणी करावी.
शासन आदेशानुसार १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्याची जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी प्रभावी अंमलबजावणी करावी. विभागीय आयुक्त हे आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी कृती आराखड्याच्या अनुषंगाने आढावा घेणार आहेत. हा कार्यक्रम दि. १५ एप्रिलपर्यंत यशस्वीपणे राबवून त्याचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या मुद्यांवर होणार प्रभावी अंमलबजावणी
संकेतस्थळ
सुकर जीवनमान
स्वच्छता
जनतेच्या तक्रारींचे निवारण
कार्यालयीन सोयी व सुविधा
गुंतवणूक प्रसार
क्षेत्रीय कार्यालयांना भेटी
नागरिकांकडून आपले सरकार, पी जी पोर्टल, ऑनलाईन आरटीआयसह कार्यालयास प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या भेटीसाठी वेळ राखून ठेवावी. दौऱ्यावर असल्यास अन्य अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. गटविकास अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता सभा घेवून प्राप्त तक्रारींचा निपटारा करावा. १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्याची जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी प्रभावी अंमलबजावणी करावी. यामध्ये कोणतीही टाळाटाळ अगर हलगर्जीपणा होणार नाही या दृष्टीने कामकाज करावे.
– याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी





