सातारा : जिल्हा परिषद शाळांचा पट वाढावा म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद सातारा आयोजित ‘गुढी पाडवा,पट वाढवा’ या अभियाना अंतर्गत सातारा जिल्हा परिषद साताराच्या विविध प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेची गुढी उभारून पट नोंदणी अभियानाची सुरूवात करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडोली (ता. सातारा) येथे आयोजित कार्यक्रमास शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी भेट दिली. शाळेच्या वैशिष्ट्याने सजविलेली शैक्षणिक गुणवत्तेची गुढी शबनम मुजावर यांच्या हस्ते उभारण्यात आली. इयत्ता पहिलीत दाखल विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविधरंगी फुग्यांची कमान, कार्टूनचे कट आउट, रांगोळीची सजावट करून शैक्षणिक वातावरण निर्मिती केली होती. या दाखल पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तयारीचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. मुलांचे शब्द वाचन, अंक वाचन, सभाधिटपणा याचे मान्यवरांनी खूप कौतुक केले. सर्व मुलांचे वही, पेन्सिल, गुलाब पुष्प देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले. शाळेतील सर्व उपक्रम व गुणवत्ता पूर्ण कार्यक्रम याचा त्यांनी आढावा घेतला व प्रशंसा केली. याप्रसंगी येणारी पिढी ही शैक्षणिक दृष्ट्या प्रगत करण्याबरोबर सुसंस्कारी घडवण्याचे काम पालकांनी व शिक्षकांनी करण्याचे आणि शाळेच्या गुणवत्तेत, दर्जात वाढ झाल्याने येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शाळेचा पट १००० च्या वर नेण्याचे आवाहन शबनम मुजावर यांनी केले. इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या बालकाचे शाळेतील पहिले पाऊल उमटवण्यात आले. यावेळी उभारलेल्या ‘सेल्फी पाईंट’ वर आपल्या चिमुकल्याची छबी पालकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. 71 दाखल पात्र विद्यार्थ्यांची पट नोंदणी आजच झाली त्याबद्दल सर्व शिक्षक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांचे कौतुक केले. केंद्रप्रमुख उध्दव भस्मे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. मनिषा साळुंखे, माजी मुख्याध्यापक लालासाहेब जाधव, उद्योजक संग्रामसिंह जाधव, मुख्याध्यापक अनिल जायकर, शिक्षक, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.