Satara : मिरजेवाडीत पाझर तलावात बुडून युवकाचा मृत्यू

खंडाळा : पाझर तलावात हात-पाय धुण्यास गेला असताना तोल जाऊन पाण्यात पडल्याने रितेश मोहन साळुंखे (वय 19, मूळ रा. मिरजेवाडी, ता. खंडाळा सध्या रा. कात्रज, पुणे) या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना खंडाळा तालुक्यातील मिरजेवाडी येथे घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कात्रज, पुणे येथे कामानिमित्त स्थायिक असलेल्या मोहन साळुंखे हे मूळगावी मिरजेवाडी गावच्या हद्दीत पायकडा नावाच्या शिवारातील तलावाजवळ शेतामध्ये गहू काढण्यासाठी मुले व पत्नी समवेत आले होते.
यावेळी गहू काढणी झाल्यानंतर संबंधित हे पाझर तलावावर हात-पाय धुण्यास गेले असता रितेश साळुंखे हा तोल जाऊन पाण्यात पडला. यावेळी पाण्याचा आवाज आल्याने मोहन साळुंखे व त्यांच्या पत्नीने पाहिले असता रितेश हा पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, मोहन साळुंखे व त्यांच्या पत्नीच्या डोळ्यादेखत रितेश साळुंखे हा पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती कळताच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किर्ती म्हस्के, पोलीस अंमलदार सुरेश मोरे, प्रशांत धुमाळ यांनी धाव घेतली. शिरवळ रेस्क्यू टिम, भोईराज आपत्ती व्यवस्थापन संघ भोर, शिरवळ यांना पाचारण करण्यात येत रितेश साळुंखे याचा पाण्यामध्ये शोध घेत असताना 4 तासांच्या परिश्रमानंतर रितेश साळुंखे याचा मृतदेह शोधण्यात यश आले.
शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात येत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. शिरवळ पोलीस स्टेशनला आकस्मिक मयत म्हणून नोंद झाली आहे.





