Satara : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला युवकाची आत्महत्या

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला झाडाला गळफास घेवून युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. किरण गोविंद काळे (वय २७, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नगरपालिकेचा एक कर्मचारी रविवारी सकाळी साडेसहा वाजता पाणी सोडण्यासाठी माची पेठेतील पाण्याच्या टाकीजवळ गेला असता त्याला अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याजवळ झाडाला मृतदेह लटकलेला दिसला.
याची माहिती त्याने नगरसेवक धनंजय जांभळे यांना दिली. त्यानंतर जांभळे यांनी तेथे जाऊन पाहिले असता माची पेठेतील किरण काळे याचा तो मृतदेह असल्याचे समजले. यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. किरण काळे हा एका फायनान्स कंपनीमध्ये काम करत होता. त्याने कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.





