Satara : मान्याच्यावाडीतील महिला झाल्या जमिनीच्या मालकीणबाई

कराड : पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीत जागतिक महिला दिनानिमित्त लक्ष्मी मुक्ती योजनेच्या माध्यमातून येथील महिलांना जमिनीच्या सातबारावर पुरुषांबरोबरीचे स्थान देऊन महिला दिनी चक्क ७/१२ ची भेट देण्यात आली.
रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करणाऱ्या येथील महिलांच्या नावावर ७/१२ करुन मालकीणबाईचा दर्जा दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता. यावेळी फेरफारचे वाटप करुन महिलांचा सन्मान करणारा हा सोहळा गावात पार पडला. याप्रसंगी पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार अनंत गुरव, मंडल अधिकारी देशमुख, तलाठी राजश्री पवार, सरपंच रवींद्र माने, दिलीप गुंजाळकर, उत्तमराव माने, अधिकराव माने, विठ्ठल माने, पोलीस पाटील विकास माने, दादासाहेब माने, लता आसळकर, सीमा माने, निर्मला पाचुपते, मनिषा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशपातळीवर सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरल्यानंतर मान्याचीवाडी गावात पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट दिली होती. त्यावेळी या गावाने लक्ष्मी मुक्ती योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले होते. त्यानंतर येथील ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा आयोजित करून गावातील सर्व खातेदारांना लक्ष्मी मुक्ती योजनेबाबत माहिती दिली. सर्वच खातेदारांनी आपल्या जमिनीच्या हिश्यात सहखातेदार म्हणून लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पत्नीची नोंद करण्याबाबत संमती दर्शवली. त्यानुसार या गावात जागतिक महिला दिनानिमित्त पहिल्या वीस लाभार्थी महिलांना या योजनेद्वारे फेरफारचे वाटप करण्यात आले. तसेच जीर्ण झालेल्या रेशनकार्डचे नव्याने वाटप करण्यात आले. अंत्योदय योजनेतील महिलांना साडीचेही वाटप करण्यात आले.
यावेळी सोपान टोम्पे म्हणाले, “या गावाने ऐक्यातून मोठी प्रगती केली आहे. लक्ष्मी मुक्ती योजनेसारखा आदेश 33 वर्षांपूर्वी झाला असताना सुद्धा या आदेशानुसार या गावाने खऱ्या अर्थाने महिलांच्या नावावर सातबारा करून त्यांना महिला दिनी अनोखी भेट देऊन त्यांचा सन्मान केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतलेला हा निर्णय महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेलच. मात्र, हे गाव लक्ष्मी मुक्ती योजनेसाठी मार्गदर्शक ठरेल.” यावेळी तहसीलदार अनंत गुरव यांनीही गावातील उपक्रमांमध्ये असलेला महिलांचा सहभाग आणि योगदानाबद्दल कौतुक केले.





