Satara : पुसेसावळी गटातील प्रश्न सोडविणार

पुसेसावळी : कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणाच्या उद्देशाने आमदार मनोज घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील जनतेसाठी येथील कलाई मंगल कार्यालयात झालेल्या जनता दरबारामधे १३५ तक्रारींचा जागीच निपटारा करण्यात आला. पुसेसावळी येथील १०८ रुग्णवाहिकेच्स प्रश्नासह गटातील शेती- पाणी प्रश्न, रस्ते, वीज यांसह सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. मनोज घोरपडे यांनी दिली.
या जनता दरबारच्या उद्घाटनप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, वर्धन ॲग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमशिल कदम, तहसीलदार बाई माने, तालुका वैद्यकीय अधिकारी युनुस शेख, पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाघमारे, सहायक निबंधक बाळासाहेब भोसले, हरिश्चंद्र घार्गे, श्रीकांत पिसाळ यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते. कराड उत्तर मतदारसंघातील खटाव तालुक्यातील समाविष्ट गावांसाठी असलेल्या जनता दरबारामधे एकूण १८० पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी १३५ तक्रारींवर जागेवरच निर्णय घेण्यात आले. ४५ हून अधिक तक्रारी प्रलंबित असून त्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश आ. घोरपडे यांनी दिले. यामुळे सर्वसामान्य जनतेमधे समाधानाचे वातावरण आहे.
जनता दरबारात नागरिकांनी रस्ते, वीज, शेतजमीन प्रश्न, वारस नोंदी, पाणी प्रश्न, आरोग्य यांसह विविध विषयांच्या समस्या मांडल्या. आ. मनोज घोरपडे म्हणाले, सर्वसामान्य माणसांचे बहुतांशी प्रश्न शासनाशी, प्रशासनाशी निगडित असतात. ते प्रश्न ऐकून घ्यावेत, हे प्रश्न चर्चेतून, संवादातून सुटावेत यासाठी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. माझ्यासह शासकीय, प्रशासकीय अधिकारी जनतेच्या प्रश्नांसाठी, सेवेसाठी असतात. त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते वेळेत सोडविले तर जनतेचा आशीर्वाद आपल्याला मिळेल, त्यांनी स्पष्ट केले.
धैर्यशील कदम म्हणाले, जनता दरबारातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार असून पंधरा वर्षात पहिल्यांदाच असा जनता दरबार होत आहे. अधिकारी व जनता यांमध्ये समन्वय असला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झिरो पेंडन्सी संकल्पनेनुसार अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे. यावेळी विविध शासकीय अधिकारी,पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.





