Satara : औंधसह 21 गावांसाठी पाणी योजनांना मिळणार गती

सातारा : जिहे-कठापूर आणि उरमोडी पाणी योजनांच्या उर्वरित आणि खटाव तालुक्यातील औंधसह 21 गावांच्या पाणी योजनेच्या कामांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हिरवा कंदील दिला आहे. ही कामे त्वरित मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी दिले. सोळशी धरणाबाबतही पुनर्वसित गावांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा खात्याचे सचिव दीपक कपूर आणि उच्चपदस्थ अधिकार्यांच्या उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी (दि. 8) बैठक झाली. त्यामध्ये औंध आणि आंधळी उपसा सिंचन योजनांची (जिहे-कठापूर) उर्वरीत कामे, जिहे-कठापूर विस्तारीत योजनेची कामे, उरमोडी थेट पाइपलाइनच्या कामाची सुधारित प्रशासकीय मान्यता, नियोजित सोळशी धरण आदी कामांबाबत चर्चा झाली. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. विवेक देशमुख, शेती पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष मांडवे, उपाध्यक्ष धनाजी आमले, सचिन सूर्यवंशी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि मंत्री गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे औंध उपसा सिंचन योजनेला चार दिवसांपूर्वी राज्यपालांची मान्यता मिळाली आहे. त्यानंतर लगेचच बुधवारी (दि. 8) जलसंपदा व ग्रामविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये योजनांची सद्य स्थिती, समाविष्ट गावे, सुधारित प्रशासकीय मान्यता यावर चर्चा करून, प्रशासकीय पातळीवर असलेल्या अडचणी दूर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
आंधळी उपसा सिंचन वाढीव योजना आणि मुख्य जिहे-कठापूर योजनेला केंद्राकडून निधी उपलब्ध करण्याबाबत चर्चा झाली. उरमोडी व कण्हेरच्या आवर्तनासाठी एकच कालवा असल्याने, सांगली व सातारा जिल्ह्यात आवर्तन सोडण्यात अडचणी येत आहेत. जवळपास दोन टीएमसी पाणी वाया जात असल्याचे मंत्री गोरे यांनी सांगितले. त्यामुळे उरमोडी धरणापासून थेट पाइपलाइन आणि या कामासाठी एक हजार कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव विचारात घेण्यात आला. याबाबत अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या. डॉ. येळगावकर यांनी मंत्री गोरे यांच्याकडे मागणी केल्याप्रमाणे, मायणी धरणात येणार्या टेंभूच्या पाण्याचे वितरण करण्यासाठी पाइपलाइन आणि कानकात्रे तलावाचा कालवाही जीर्ण झाल्याने पाइपलाइन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. तारळी योजनेच्या पावतका येथील पाइपलाइनचा प्रस्तावही स्वीकारण्यात आला.
पाणी योजनांसाठी गोरे यांचे मोठे योगदान
दुष्काळी भागातील पाणी योजनांसाठी मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रयत्न आणि योगदान मोठे आहे. अनेक वेळा रात्री दोन दोन वाजेपर्यंत त्यांनी योजनांच्या कामांची पाहणी केल्याचे गौरवोद्गार मंत्री विखे-पाटील आणि सचिव दीपक कपूर काढले. माझ्या मतदारसंघाचा दुष्काळी हा कलंक तीन वर्षांत पुसायचा आहे. त्यासाठी माण-खटावच्या सर्व योजना ताकदीने पूर्ण करणार आहे, असे मंत्री गोरे यांनी सांगितले.





