Satara water crisis: सातार्यात पाणीटंचाईची झळ! प्लास्टिक बॅरलची विक्री जोरात, किंमत वाचून थक्क व्हाल
Satara water crisis: कास आणि कण्हेर धरणातील पाणीसाठा खालावल्याने सातार्यातील अनेक पेठांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा; प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप.

Satara water crisis – शहरात सुरू असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिकांची गैरसोय होत असून पाणी साठवण्यासाठी प्लॅस्टिक ड्रम, टाक्या आणि जार यांच्या खरेदीत वाढ झाली आहे. पालिकेकडून प्रत्येक पेठेत दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने, नागरिकांना पाण्याचे नियोजन करूनच दैनंदिन कामे करावी लागत आहेत. कास धरणातून शहराला पाणीपुरवठा सुरू असला, तरी उपनगरांमध्ये जीवन प्राधिकरणामार्फत होणार्या पाणीपुरवठ्यावर कपातीचे संकट तीव्र झाले आहे.
कण्हेर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने, अनेक भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. दोन दिवसांपूर्वी समाधी माळ परिसरातील महिलांनी पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे यांना घेराव घालून, पाणी समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शाहूनगर, सदरबझार, भोसले मळा, करंजे व शुक्रवार पेठेतील काही भागांमध्ये अत्यंत कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
काही ठिकाणी नळांना अवघे दहा ते पंधरा मिनिटे पाणी येत असल्याने, नागरिक उपलब्ध पाणी साठवून ठेवण्यावर भर देत आहेत. त्यामुळे बुधवार नाका, खंडोबाचा माळ व इतर भागातील दुकानांमध्ये प्लॅस्टिक ड्रम, टाक्या आणि पाण्याचे जार खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. 20 ते 50 लिटरपासून 100 लिटरपर्यंतचे ड्रम नागरिक खरेदी करत आहेत. मोठ्या सोसायट्या, हॉटेल व्यावसायिक आणि मोठी कुटुंबे 200 ते 500 लिटर क्षमतेच्या टाक्यांना प्राधान्य देत आहेत.
बोगदा ते डबेवाडी मार्गावर काही विक्रेते प्लॅस्टिक बॅरलची विक्री करत आहेत. 300 लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिक ड्रमची किंमत सुमारे 1100 रुपयांपर्यंत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. दरम्यान, पाणी कपातीच्या दिवशी प्रत्येक पेठेत पाण्यासाठी धावाधाव होत असून, अनेक नागरिक घराच्या बाल्कनी किंवा पार्किंगमध्ये ड्रम भरून ठेवत आहेत. स्वयंपाक, भांडी, कपडे धुण्यासाठी नियोजन करावे लागत आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांची चिंता वाढली असून, प्रशासनाने नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरत आहे.




