Satara : जिल्हा बँकांचे विविध प्रश्न मार्गी लागणार

सातारा : राज्यातील जिल्हा बँकांचे विविध प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील, असे आश्वासन राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष, पदाधिकारी व अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिले.
बँकेचे संचालक व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र्सिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे अध्यक्ष बॅंकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, संचालक राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या उपस्थितीत बँकेच्या अडीअडचणी अनुषंगाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या दालनात नुकतीच बैठक झाली. विकास सेवा संस्थाचे केडर संरचना अंमलबजावणी अनुषंगाने नियमावली कामकाज अंतिम टप्प्यात आहे. जिल्हास्तरीय समितीची मान्यता असलेल्या विकास सेवा संस्थाच्या सचिवांचा समावेश केडरमध्ये होणार आहे.
केडर संरचना अंमलबजावणीचे निकषावर विस्तृत चर्चा होऊन सर्वांची संमत्ती झाली. केडर संरचना अंमलबजावणीच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमावली लवकरात लवकर देण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी अधिकार्यांना दिल्या. एकाच आर्थिक वर्षात दोन हंगामाची ऊस पीक कर्जाची उचल करून परतफेड केलेल्या जिल्ह्यातील ११ हजार सभासदांचे प्रोत्साहनपर रक्कम प्रस्ताव पाठवले असून अद्याप लाभ मिळाला नसल्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. सहा जिल्ह्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकर्यांचे प्रस्ताव आले आहेत.
सहकार खात्याकडे निधी उपलब्ध असून नजीकच्या दिवसात पात्र सभासदांना लाभच्या रक्कमा वितरित करण्याचे आश्वासन ना. बाबासाहेब पाटील यांनी दिले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील जवळपास ११ हजार सभासदांना ४० कोटी रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभाच्या रक्कमेचा फायदा होणार आहे.
विकास सेवा संस्थेच्या सभासदांच्या कर्ज वितरणावर शेअर्स कपात केली जाते. मात्र, याची मर्यादा २० हजार रुपयांपर्यंत सीमित असल्याने राज्यातील बहुतांश विकास सेवा संस्थामध्ये सभासदांची २० हजारांची मर्यादा पूर्ण झाली असल्याने संस्थांना निधी उभारणी करण्यासाठी अडचणी निर्माण होत असून मर्यादा ५० हजारांपर्यंत वाढवण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. संस्थांना स्वनिधी कमी पडत आहे. मर्यादेत गेल्या ३० वर्षापासून वाढ झालेली नसल्याने संस्थाची कर्ज उभारणीची मर्यादा सीमित झाली आहे. निधी व जिल्हा बँकाचे २.५० टक्के व्याज परतावा रक्कम विलंबाने मिळत आहेत.
वेळेत निधी मिळाल्यास संस्था व बँकाना उत्पन्नवाढीसाठी चालना मिळणार आहे. निधी वितरणाचे नियोजन सुरू असून लवकरच निधी उपलब्ध करून देत असल्याचे आश्वासन ना. पाटील यांनी दिले. या सर्व प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा होऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन नाय पाटीलयांनी दिले. बैठकीस राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे व सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.





