Satara : जिल्ह्यातील जनावरांना लंपी, घटसर्प, फऱ्या आजाराचे लसीकरण

सातारा : पावसाळ्यात जनावरांना साथीच्या आजाराची लागण होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्ह्यातील जनावरांना लंपी चर्मरोग, घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार आजारांचे लसीकरण करण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी दिली.
शेतकऱ्यांनी पशु पक्षांमध्ये उद्भवणाऱ्या विविध विषाणूजन्य व जिवाणूजन्य रोगांना प्रतिबंध करण्याकरिता आपल्या जनावरांना नियमितपणे लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. जनावरांमध्ये लाळ्या खुरकत, घटसर्प, फऱ्या, ब्रुसेलोसिस, लम्पी चर्मरोग, अंथक्स, पीपीआर, इत्यादी महत्वाच्या रोगाविरुद्ध परिणामकार लस उपलब्ध आहे. लसीकरणामुळे रोग प्रादुर्भावाचे प्रमाण कमी होतो व पशुपालकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळणे शक्य होते.
राज्यातील पशुधनास होणाऱ्या रोगास प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून करण्यात येणाऱ्या लसीकरणाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यास अनुसरून साथीच्या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्ह्यात मान्सूनपूर्व लसीकरण करण्यात येत असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
राज्यात सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर सन 2022-23 व 2023-24 मध्ये रोगाचा फैलाव होऊन मोठ्या प्रमाणात पशुधनाची हानी झाली होती. तथापी सन 2024-25 मध्ये राज्यभरात झालेल्या व्यापक लसीकरणामुळे राज्यात अत्यल्प प्रमाणात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव आढळून आला होता. लम्पी चर्मरोगाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन गोवंशीय पशुधनाचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने होणे अत्यावश्यक आहे. याबरोबर गाई व म्हैस वर्गीय पशुधनास घटसर्प, फऱ्या या आजाराचे लसीकरण तसेच शेळ्या मेंढ्यातील आंत्रविषार लसीकरण पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे आहे. जनावरांचे लसीकरण विहित कालावधीत व प्रभावीपणे होण्यासाठी लसीकरण मोहीम स्वरुपात जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यात ही लस उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.
अशी होणार लसीकरण मोहीम
लंपी चर्मरोग – २५ एप्रिल ते १५ मे
घटसर्प, फऱ्या- १६ मे ते १५ जून
आंत्रविषार (शेळ्या, मेंढ्यांमध्ये) – १६ मे ते १५ जून





