Satara : खंबाटकी घाटात अभूतपूर्व वाहतूक कोंडी

खंडाळा : पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळ्यानजिक खंबाटकी घाटात टँकरमधून मोठया प्रमाणात ऑईल गळीत झाल्याने दुपारपासून रात्रीपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे भर उन्हात घाटात अभूतपूर्व वाहतूक कोंडी अनुभवास मिळाली. यामुळे वाहनधारकांसह पोलीस कर्मचार्यांचा चांगलाच घाम फुटला होता. पोलीस सांडलेले ऑईल दूर करण्यासाठी उपाय योजना करत होते मात्र वाहतूक कोंडीमुळे त्यात अडचण येत होती. वाहतूक ठप्प झाली होती तर अनेक दुचाकी वाहने ऑईलवरु घसरुन अनेक छोटे मोठे अपघात घडले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास खंबाटकी घाटातील भैरवनाथ मंदिर परिसरामध्ये ऑइल वाहतूक करणारा टँकर (एम.एच.04 एचएस6844) बंद झाला. त्यामधून मोठ्या प्रमाणावर ऑइलची गळती झाल्याने संपूर्ण परिसरात रस्त्यावर ऑईल पसरले गेले. टँकरमधून मोठ्या प्रमाणामध्ये ऑईलची गळती झाल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती. टँकर मधून गळती झालेल्या ऑइलमुळे असंख्य दुचाकी घसरून छोटे-मोठे अपघात झाले. यामुळे दुचाकी व चारचाकीसह मोठे ट्रकही घसरू लागले यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती कळताच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के, पोलीस अमलदार प्रकाश फरांदे, अमित चव्हाण, दत्ता दिघे, संजय जाधव, सचिन शिंदे व महामार्ग पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. ऑईल दूर करण्यासाठी पोलीस दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. रात्री तिथे माती टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पोलीस कर्मचारी देखील हैराण झाले होते. रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर ऑईल दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु होते.
दुचाकीस्वारांचा बेशिस्तपणा
ऑईल सांडलेले दिसत असतानाही आणि पोलीस कर्मचार्यांनी सूचना देऊनही काही उपद्रवी दुचाकीचालक विचित्र पद्धतीने गाडी चालवून घसरून पडत होते. सुमारे पंधरा ते वीस दुचाकी पडल्याने दुचाकीस्वारांची अती घाई..संकटात नेई अशी परिस्थिती निर्माण झाली होती. भर उन्हाचा तडाखा आणि वाहतूक कोंडीने सर्वांचाच चांगला घाम काढला.





