Satara : पसरणी घाटातील अपघातात दोन युवक ठार

वाई : वाई-पाचगणी रस्त्यावर गुरुवारी (दि. 13) झालेल्या अपघातात लोणी काळभोर (ता. हवेली, जि. पुणे) येथील अक्षय म्हस्कू काळभोर (वय 26) आणि सौरभ जालिंदर काळभोर (वय 26) या मित्रांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर लोणी काळभोर येथील स्मशानभूमीत शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघांच्या अपघाती मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. सौरभच्या पश्चात पत्नी, नवजात मुलगी, आई, वडील, तर अक्षयच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
याबाबत माहिती अशी, लोणी काळभोर येथील अक्षय काळभोर, सौरभ काळभोर, वैभव काळभोर व बजरंग काळभोर हे मित्र दोन दिवसांपूर्वी पांढर्या रंगाच्या कारमधून (एमएच-12-क्यूटी-7711) कोकणात फिरायला गेले होते. होळीचा सण घरी साजरा करण्यासाठी ते गुरुवारी (दि. 13) परतीच्या प्रवासाला निघाले होते. महाबळेश्वर-पाचगणीमार्गे पुण्याकडे जात असताना, पसरणी घाटातील बुवासाहेब मंदिराजवळ शंभर मीटर अंतरावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर त्यांची गाडी थेट दोनशे फूट खोल दरीत कोसळली.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण भालचीम, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे व सिद्धनाथवाडी येथील शिवसह्याद्री रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली. जखमींना दोराच्या साह्याने खोल दरीतून बाहेर काढण्यात आले. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती.
अनेक वाहने रस्त्यावरच उभी राहिल्याने घाटात दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या अपघातातील चारही जखमींना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे अक्षय काळभोर व सौरभ काळभोर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वैभव काळभोर व बजरंग काळभोर यांच्यावर वाई येथील बेल एअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





