Satara : डोंगररांगांत गाजणार पर्यटनाचा उत्सव !

कोयनानगर : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात प्रथमच भव्य ‘डोंगरी महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकार होणारा हा महोत्सव पाटणच्या निसर्गसंपन्नतेला आणि स्थानिक संस्कृतीला नवी ओळख देणारा ठरणार आहे.
निसर्ग, पर्यटन आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम असणाऱ्या या महोत्सवात पाटण तालुक्यातील डोंगररांगांतील जैवविविधता, स्थानिक कला, सांस्कृतिक परंपरा, हस्तकला, खाद्यसंस्कृती, तसेच पर्यटनाची वैशिष्ट्ये उलगडली जाणार आहेत. पर्यटकांसाठी ट्रेकिंग, निसर्गभ्रमण, स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला प्रदर्शन आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
पर्यटनाला चालना, स्थानिकांना रोजगाराची संधी,
पाटण तालुक्यातील पर्यटनस्थळे आणि सांस्कृतिक परंपरा यांना राज्यभरात ओळख मिळावी, यासाठी डोंगरी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे देसाई यांनी सांगितले.
महोत्सवाचे प्रमुख आकर्षण
डोंगररांगांमध्ये साहसी ट्रेकिंग
स्थानिक लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रम
हस्तकला आणि कृषी उत्पादनांचे प्रदर्शन
पारंपरिक खाद्यपदार्थांची चव
निसर्गप्रेमींना विशेष साहसी उपक्रम
स्थानिकांचा उत्स्फूर्त सहभाग
महोत्सवात स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, महिला बचत गट, हस्तकला व्यावसायिक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे. स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री यामुळे त्यांना आर्थिक लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.
पर्यटकांना आवाहन
हा महोत्सव केवळ निसर्ग सौंदर्याचा अनुभव देणारा नाही, तर स्थानिक जीवनशैली, संस्कृती आणि परंपरेचा परिचय करून देणारा ठरेल. त्यामुळे राज्यातील पर्यटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले.





