Satara : पदे घेणाऱ्यांना पक्षाचे काम करावेच लागेल

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात मजबूत संघटन आहे. सातारा जिल्ह्यातही पक्षाची मजबूत बांधणी करण्यात येत असून पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. पदे घ्यायची आणि पक्षाचे काम करायचे नाही असे आता चालणार नाही. पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असाल तरच पदे घ्या, असा इशारा खासदार नितीन पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा गुरुवारी जिल्हा कार्यालयात झाला. या कार्यक्रमात नूतन पदाधिकारी निवडी करण्याबरोबरच अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी खा. पाटील बोलत होते. यावेळी आ. सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, जिल्हा बॅंकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, प्रदीप विधाते, माजी सभापती संजय देसाई, मंगेश धुमाळ, किरण साबळे- पाटील, सौ. प्रतिभा शिंदे, शिवाजीराव महाडिक, रामभाऊ ढेकळे आदी उपस्थित होते. खा. नितीन पाटील म्हणाले, ‘जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला करण्यासाठी अजित पवार यांच्या सूचनेनुसार आगामी काळात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असल्याने पक्षाचे मजबूत जाळे निर्माण करण्यात येत आहे.
त्या पार्श्वभूमीवर काही पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून उर्वरित पदाधिकारीही लवकरच निवडले जातील. आतापर्यंत पक्षाची पदे घेऊन काही पदाधिकारी काम करत नसल्याच्या तक्रारी होत्या. आता तसे चालणार नसून पद हवे असेल तर पक्षाचे काम करावेच लागेल. अजित पवार यांनी आ. मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद तर मला खासदारकी दिली. अजितदादांनी जिल्ह्यातील प्रश्नांना नेहमीच न्याय दिला. त्यामुळे अजितदादांचे हात मजबूत करण्यासाठी आपणा सर्वांना गट, तट सोडून काम करावे लागेल.
आ. सचिन पाटील म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मजबूत संघटन करण्यावर भर राहणार आहे. सर्वांना बरोबर घेवून पक्षाची ध्येय, धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यात येतील. बाळासाहेब सोळसकर म्हणाले, मागील निवडणुकीत काही मंडळी आपल्याला सोडून गेली. राजकारणात इनकमिंग, आउटगोइंग सुरु असते. त्यामुळे आपण नव्या जोमाने पक्षाला आणखी मजबूत करुया. जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून आता नव्या उमेदीच्या पदाधिकाऱ्यांना संघटनेत स्थान देण्यात येत आहे. जिल्हा अजित पवार यांच्या विचारांचा उभा करायचा असून त्यासाठी पक्ष नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय मेळावा लवकरच घेण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. किरण साबळे – पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सरचिटणीस निवास शिंदे यांनी आभार मानले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा
कार्याध्यक्षपदी संजय देसाई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) जिल्हा कार्याध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय देसाई, युवक जिल्हाध्यक्षपदी वडूजच्या दादासाहेब गोडसे यांचे नातू पृथ्वीराज गोडसे, फलटण तालुकाध्यक्षपदी जिल्हा बॅंकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, माण तालुकाध्यक्षपदी म्हसवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष युवराज सूर्यवंशी, महिला आघाडीच्या फलटण तालुका अध्यक्षपदी सौ. प्रतिभा शिंदे यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली. या मेळाव्यात माजी सभापती रामभाऊ ढेकळे, नंदकुमार नाळे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.





