राहाता – राहाता शहरातील स्वामिनी अर्बन मल्टिपल पर्पज निधी लिमिटेड या संस्थेने गुंतवणूकदारांची ७४ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा राहाता पोलिसात दाखल झाला . या प्रकरणामुळे ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सुधाकर रमेश पाटील राहणार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, स्वामिनी अर्बन मल्टिपल पर्पज निधीचे चेअरमन संतोष अर्जुन बुधवंत हे राहुरी खुर्द येथे राहत आहे संतोष बुधवंत यांनी राहाता शहरात स्वामिनी अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड या नावाची निधी स्थापना करून ठेवीवर १२% व्याजदर देऊन ठेवीदारांचा विश्वास संपादन केला. पैशाच्या ठेवी ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जात होत्या व मुदत संपली की मूळ मुद्दल व व्याज अशी एकूण रक्कम ठेवीदाराला मिळत होती. सुरुवातीला निधी कंपनीमध्ये मी गुंतवणूक केल्याच्या निधीचा व्यवहार सुरळीत चालू असल्यामुळे मला वेळोवेळी व्याज मिळत होते.
त्यामुळे माझा निधीवर विश्वास बसल्याने मी ठेवीचा कालावधी संपल्यानंतर मूळ मुद्दल व व्याज असा एकूण ठेव पुढील कालावधीसाठी ठेवत होतो. मी जमा केलेली रक्कम २४ लाख ९५ हजार रुपये ठेव ठेवली. मुलाच्या शिक्षणासाठी व्याजासह रक्कम मागण्यासाठी गेले असता संस्थेचे चेअरमन याने माझी ठेव ठेवलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागले.
उलट माझ्याकडे पैसे नाही. तुला काय करायचे ते कर. अशी धमकी देऊ लागल्याने शेवटी मी पोलिसांचा धाव घेतली . माझ्याबरोबर अजित तुकाराम बोरावके राहणार साकुरी यांचे ३० लाख, गोविंद रघुनाथ आमकर, राहाता यांचे ७ लाख ९० हजार अशोक कारभारी खैरकर,मोरवाडी ७ लाख ३७ हजार, संतोष कारभारी गुंजाळ तळेगाव १ लाख २२ हजार, सुभाष कोंडेकर १ लाख २० हजार, श्रुती शेळके दीड लाख असे एकूण ७४ लाख ८८ हजारांची फसवणूक संतोष बुधवंत व त्यांची पत्नी संगीता बुधवंत यांनी केल्याप्रकरणी राहाता पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.