Satara : कराड- चिपळूण रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय करा

सातारा : कराड ते चिपळूण दरम्यान रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपायोजना करा. या मार्गात असलेली अतिक्रमणे काढून टाकण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मुंबई येथून शासकीय निवासस्थानातून दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मंत्री देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, दूरदृष्य प्रणालीद्वारे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, पोलीस उपअधीक्षक विजय पाटील, राष्ट्रीय महामार्ग पुण्याचे अधीक्षक अभियंता दयानंद विभुते, तहसीलदार अनंत गुरव, राष्ट्रीय महामार्गच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कराड-चिपळूण महामार्गावरील राडारोडा प्राधान्याने काढावा, अशा सूचना करुन पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘या मार्गावरील वाहतूक सुरळीत व अपघात होणार नाहीत यासाठी प्राधान्याने खड्डे बुजवावेत. पावसामुळे महामार्गावर पाणी साठणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. रस्त्याशेजारी साईडपट्ट्या खचल्या आहेत अशा ठिकाणी त्या पहिल्यांदा भरुन घ्याव्यात.
हे काम येत्या आठ दिवसांत करावे, असे निर्देश देऊन प्रांत, तहसीलदार व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी कराड- चिपळूण मार्गाची पाहणी करुन आणखी करावयाच्या उपयोजना सुचवाव्यात, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.





