Satara: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक

सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक वरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने दि. २९ मे रोजी रात्री हॅक केले आहे.
याबाबत ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली असून संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. हॅकरचा शोध घेण्याचे काम पोलीसांकडून सुरु आहे. या पेजवर आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर पडल्यास त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावतीने त्यांचे जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी केले आहे.
असंख्य फॅन फॉलोईंग असलेल्या ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या Chh.ShivendraRaje Bhonsle या फेसबुक पेजवर दररोज ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या चालू घडामोडी, कार्यक्रम, बातम्या आदी प्रसिद्ध केले जाते. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये हे पेज हॅक करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी हे पेज रिकव्हर करून त्याचा ॲक्सेस मिळवण्यात सातारा पोलिसांच्या सायबर सेलला यश मिळाले होते. त्यानंतर या पेजवर ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून अधिकृत पोस्ट व मजकूर प्रसिद्ध केला जात होता. दरम्यान, गुरुवार दि. २९ मे २०२५ रोजी रात्री पुन्हा हे पेज हॅक झाल्याचे निदर्शनास आले आहे.
या पेजवर कोणतीही अनधिकृत, आक्षेपार्ह पोस्ट पडल्यास त्यास संबंधित हॅकर जबाबदार असेल. तसेच अनधिकृत, आक्षेपार्ह पोस्ट अथवा मजकूर पडल्यास ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते, प्रेमी, फॅन्स, नागरिकांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
पोलीस हॅकरचा शोध घेत आहेत. पेज हॅक झाल्याने या पेजवर पडणाऱ्या पोस्ट किंवा मजकुराशी ना. शिवेंद्रसिंहराजे अथवा त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा कसलाही संबंध नाही. त्यामुळे या पेजवर आक्षेपार्ह पोस्ट पडल्यास कार्यकर्ते, प्रेमी, फॅन्स व नागरिकांनी लक्ष देऊ नये, असे आवाहन अमर मोकाशी यांनी केले आहे.





