Satara : शाहूनगर चौक ते मंगळाई देवी मंदिर रस्त्याची दुरवस्था

सातारा : साताऱ्यातील किल्ले अजिंक्यतारा रस्त्याचे पालिका प्रशासनाकडून काँक्रिटीकरण करण्यात आले. काही दिवसांपूर्वी चार भिंतीजवळील रस्त्याचेही डांबरीकरण पूर्ण झाले. परंतु शाहूनगर चौक ते मंगळाई देवी मंदिर या रस्त्याचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नाही. या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून दगड – धोंड्यांवरून दुचाकी वाहने घसरण्याच्या घटनाही वाढू लागल्या आहेत.
किल्ले अजिंक्यताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. मात्र पालिका प्रशासनाने या रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्यापासून किल्ल्यावर भटकंतीसाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या आता दुपटीने वाढली आहे. काही नागरिक पायरी मार्गाने तर काही रस्त्याने किल्ल्याकडे जात असतात. चार भिंती ते शाहूनगर चौक हा रस्ता आता गुळगुळीत करण्यात आला आहे.
तर मंगळाई देवी मंदिरापासून ते अजिंक्यतारा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत संपूर्ण काँक्रीट रस्ता आहे; परंतु शाहूनगर चौकापासून मंगळाई देवीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. हा रस्ता तीव्र उतराचा व वळणाचा आहे. या रस्त्यावरील खडी व लहान-मोठे दगड बाहेर आले आहेत. साईडपट्ट्याही खचल्या आहेत. त्यामुळे किल्ल्यावरून शाहूनगर चौकाकडे जाताना दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेक नागरिक आपली वाहने चौकात रस्त्याकडेला उभी करून किल्ल्याकडे मार्गस्थ होतात.
कॉंक्रिटीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा
पालिका प्रशासनाकडून अजिंक्यतारा, चारभिंती येथील रस्ता रुंदीकरणासह विकसित करण्यात आला. केवळ मंगळादेवी मंदिरालगत असलेला रस्ताच दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. किल्ल्यावरील रस्त्याप्रमाणे पालिकेने याही रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी नागरिकांची मागणी आहे.





