Satara : सावली होणार सूर्यघर वीज बिल मुक्त गाव

मेढा : जावळी तालुक्यातील सावली गावांचा पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना राबवण्याचा एकमुखी निर्णय झाला आहे. गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून सर्वच गावाने वीज बिल मुक्त होण्याचा निर्धार केला. यावेळी डॉ. पाटील व सहायक अभियंता सुरेश कुंभार यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले.
सावली येथे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांनी सरपंच विजय सपकाळ व ग्रामपंचायत सदस्य यांना बोलावून या योजनेबाबत तातडीने बैठक घेण्यास सांगितले. सावली समाजपयोगी उपक्रमशील गाव आहे. ग्रामस्थांची एकी आणि प्रतिसाद असल्यामुळे सावली गावाची आपण निवड करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सावली येथे गटविकास अधिकारी डॉ. पाटील, सहायक अभियंता कुंभार यांनी बैठक घेतली. पीएम सूर्यघर योजनेची माहिती देवून ग्रामस्थांच्या शंका निरसन केल्या. ही योजना गावात राबवायची का ? असे विचारले असता सर्वांनीच एकमुखी राबवण्याचा निर्धार केला.
पोलीस पाटील संजय कांबळेसह ग्रामस्थांच्या मागणीमुळे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी सावली गाव दत्तक घेत असल्याचे जाहीर करून वसुंधरा अभियान व स्मार्ट ग्राममध्ये गावाचे काम चांगल असलं तरी अधिक स्मार्ट करून यावर्षी आपण स्पर्धेत कसे जिंकू याबाबत सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून आपण सर्वातपरी सहकार्य करू असेही स्पष्ट केले .वीज विभागाच्या ज्या समस्या असतील त्या गावातच येऊन सोडवू. सरपंच विजय सपकाळ सातत्याने प्रयत्न करत असल्यामुळे जवजवळ २५ लाखाचा निधीही यावर्षी उपलब्ध करत असल्याचे सहायक अभियंता सुरेश कुंभार यांनी सांगितले .
सरपंच विजय सपकाळ यांनी प्रत्येक कुटुंबाच्या सहकार्यामुळे आणि ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी यांच्यामुळेच आम्ही विविध विधायक उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. प्रभारी ग्रामपंचायत अधिकारी शाहूबाई नालापल्ले यांनी गावातील उपक्रमाची माहिती दिली. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता सागर म्हस्कर उपस्थित होते. माजी सरपंच दुर्योधन जुनघरे यांनी स्वागत केले. माजी उपसरपंच विश्वनाथ जुनघरे व ग्रामपंचायत सदस्या आनंदी जुनघरे यांनी सत्कार केले. मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हस्कर यांनी आभार मानले .यावेळी महिला, ग्रामस्थ व तरूण उपस्थित होते .





