Satara : पावसाळी पर्यटनावर सातारा पोलिसांचा वॉच

सातारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे सातारा परिसरातील छोटे मोठे धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळू लागले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावासह ठोसेघर, भांबवली येथील धबधबे आणि तेथील वन सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. या पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातारा तालुका पोलिसांनी नियोजन केले असून वीस पोलिसांच्या तीन पथकांनी ठोसेघर व कास मार्गावर देवकल फाटा व भांबवली येथे पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
कास व ठोसेघर येथील पर्यटन स्थळांना मे महिन्याच्या शेवटच्या उत्तरार्धात गेल्या दोन दिवसांमध्ये सुमारे तीन हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. वास्तविक पर्यटकांची गर्दी मान्सूनचा पाऊस स्थिरावल्यानंतर ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होते. मात्र, यंदा मे महिन्यातच अवकाळीचा जोर कायम राहिल्याने ठोसेघर आणि भांबवली येथील धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळू लागले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव सुद्धा 52 फूट भरला आहे. पूर्ण क्षमतेने तलाव करण्यासाठी केवळ आठ फूट पाणीसाठा होणे शिल्लक राहिले आहे.
कास तलावामध्ये गेल्या आठवड्यात एका मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच भांबवली येथील निसर्ग वाटा निसरड्या झाल्या असून येथेही अपघात होण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निर्देशाप्रमाणे सातारा तालुका पोलिसांनी तीन विशेष पथके कास व ठोसेघर मार्गावर तैनात केली आहेत. तसेच कास तलाव परिसरात मेढा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
साताऱ्याला भेट देणाऱ्यांमध्ये विशेषतः मुंबईसह कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यांतील नागरिकांची गर्दी कायम असते. येथे दारू पार्टीच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे कास रस्त्यावर गणेश खिंड, देवकल फाटा येथे बॅरिगेट्स लावून वाहनांची तपासणी केली जात आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सुमारे 218 वाहनांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांनी दिली.
याशिवाय यवतेश्वर घाटातही वाढती हुल्लडबाजी, तेथील धबधब्यांमुळे घाटात होणारी गर्दी, पर्यायाने वाहतुकीची होणारी कोंडी टाळण्यासाठी तेथेही पोलिसांचे पथक तैनात राहणार असल्याचे सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले. रस्त्यावर कोणी हुल्लडबाजी केली तर त्याला सोडणार नाही, असा संदेश सातारा पोलिसांनी या माध्यमातून दिला आहे.





