Satara : सातारा पंचायत समिती पुणे विभागामध्ये तिसरी

सातारा : महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत पुणे विभागांतर्गत येणाऱ्या 53 तालुक्यांमधून सातारा तालुका पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या कार्यक्रमांतर्गत दि. 7 जानेवारी ते 30 एप्रिल या दरम्यानहा कार्यक्रम राबविण्यात आला. विभाग स्तरावरील निवड प्रक्रियेत पंचायत समिती गटांत सातारा पंचायत समितीला हे यश मिळाले. कार्यक्रमामध्ये विविध उपक्रम राबवून नागरिकांचे जीवनमान सुकर करण्याच्या दृष्टीने काम झाले असून त्यात सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील पंचायत समितींचा सक्रिय सहभाग होता. या अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यातील शिराळा पंचायत समिती प्रथम तर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल पंचायत समितीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
शंभर दिवसांच्या अभियानांतर्गत सातारा पंचायत समितीने स्वतःचे संकेतस्थळ विकसित करून त्यावर सर्व माहितीचे अद्यावतीकरण केले असून ही माहिती सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आहे. त्याचप्रमाणे विविध योजना राबवून नागरिकांचे जीवनमान सुकर केले आहे. कार्यालयीन स्वच्छता, अभिलेख वर्गीकरण कामकाज, निरुपयोगी साहित्यांचे निर्लेखन, ई- ऑफिस कामकाज तसेच कार्यालयीन कामकाजासाठी प्रसन्न वातावरण असण्याच्या दृष्टीने कार्यालयाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले व जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुख आणि जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी सातारा पंचायत समितीचे अभिनंदन केले.





