Satara : १४ कोटींच्या वसुलीचे सातारा पालिकेचे उद्दिष्ट

सातारा : सातारा पालिकेच्या वसुली विभागाने थकबाकीदारांवरील कारवाईची मोहीम तीव्र केली असून गेल्या महिनाभरात सहा मिळकती व १५ नळ कनेक्शन खंडित करून थकबाकीदारांना मोठा दणका दिला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे २५ दिवस उरले असून पालिकेला आता १४ कोटी ४० लाखांच्या थकबाकीचे उद्दिष्ट गाठायचे आहे.
मिळकत व पाणी कर पालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. या करांतूनच नागरिकांना स्वच्छता, आरोग्य अशा पायाभूत सेवांची पूर्तता केली जाते. तरीदेखील अनेक नागरिक कर भरत नसल्याने थकबाकी व त्यावरील दंडाची रक्कम वाढत जाते.
त्यामुळे यंदा मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली विभागाने थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र पथकांची नेमणूक करून प्रत्यक्षात कारवाईला प्रारंभ केला. महिनाभरात पथकाने सहा मिळकती सील करतानाच १५ नळ कनेक्शनही खंडित केली. या कारवाईची धास्ती घेत अनेक थकबाकीदार कर भरण्यासाठी पुढे आले आहेत.
पालिकेच्या तिजोरीत आजवर ४२ कोटींपैकी २७ कोटी ६० लाखांचा महसूल जमा झाला आहे. तर आणखीन १४ कोटी ४० लाखांचे उद्दिष्ट पालिकेला गाठायचे आहे. ते गाठण्यासाठी वसुली विभागाने मोहीम अधिक गतिमान केली असून संबंधितांनी कराची रक्कम वेळेत अदा करून कटू कारवाई टाळावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.





