Satara : जिल्ह्यात ३६ हजार ६८३ घरकुलांची मंजुरी

सातारा : पंतप्रधान आवास योजना- ग्रामीण टप्पा दोनअंतर्गत जिल्ह्यात आवास प्लस प्रतीक्षा यादीतील ३६ हजार ६८३ लाभार्थींच्या घरकुलांना मंजुरी दिली आहे. या लाभार्थींना घरकूल मंजुरी पत्राचे वितरण व यातील २५ हजार १७५ लाभार्थींना प्रथम हप्ता वितरणाची कार्यवाही उद्या शनिवारी (दि. २२) होणार आहे. राज्यात २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या सायंकाळी ४.४५ वाजता बालेवाडी (पुणे) येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मुख्य बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे.
‘सर्वांसाठी पक्की घरे’ हा केंद्र व राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असून जिल्ह्यात विविध आवास योजनांतर्गत २०१६ पासून आजअखेर २८ हजार ५४६ लाभार्थींच्या घरकुलांना मंजुरी दिली आहे. यापैकी २६ हिजार ५३० (९२.३० टक्के) एवढ्या लाभार्थींची घरकुले पूर्ण करुन त्यांना हक्काचा पक्का निवारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात 2 हजार 255 लाभार्थीं भूमिहिन असून त्यांना पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकूलसाठी जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत जागा खरेदी, शासकीय व अतिक्रमण नियमानुकूल, सार्वजनिक उपक्रमांतर्गत गायरान,ग्रामपंचायत, जिल्हा परिषद मालकीची, पुनर्वसन विभागाची जागा, शिल्लक प्लॉट, अन्य शासकीय विभागाची जागा (शेती महामंडळ, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा इत्यादी), वारस/ रिक्त नात्याच्या माध्यमातून जागा इत्यादी पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही सुरु असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी दिली.
जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभांचे आयोजन करुन हा गृहोत्सवाचा कार्यक्रम साजरा केला जात आहे. राज्यस्तरावरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. जिल्हास्तरावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात दुपारी ४ वाजता कार्यक्रम होणार आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपस्थित राहणार असून यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात 10 लाभार्थींना मंजुरी पत्र तसेच सर्वात जास्त घरकुलांची मंजूरी दिलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
तालुकास्तरावरील कार्यक्रमास आमदार, प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रित केले आहे. गामपंचायत स्तरावर लाभार्थीं, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, सरपंच, गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. घरकुलांची कामे जलद, दर्जेदार होण्यासाठी दि. 22 फेब्रुवारी ते दि. 22 मे या 90 दिवसांच्या कालावाधीत उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या लाभार्थी, सरपंच, अधिकारी, कर्मचारी, बँक शाखाप्रमुख, उमेद समूह अध्यक्ष, सेवाभावी संस्थांचा जिल्हा कक्षाच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन जिल्हास्तरावरील कार्यक्रमात सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील मंजूर घरकुलांची तालुकानिहाय यादी
अ.क्र. तालुका मंजुरी पत्र वितरण प्रथम हप्ता वितरण
1 पाटण 7344 4505
2 सातारा 5043 2799
3 कराड 4705 3876
4 खटाव 3940 2998
5 कोरेगाव 3413 2034
6 फलटण 3392 2140
7 माण 3029 2388
8 जावळी 1803 1241
9 वाई 1793 1385
10 खंडाळा 1366 1052
11 महाबळेश्वर 855 757
एकूण = 36683 25175





