Satara : सह्याद्री साखर कारखान्यात ’पट’ काढणारच…

नागठाणे : सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात सभासदांना कवडीमोल किंमत देणाऱ्या चेअरमनाना आता सभासदच जागा दाखवून देतील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांचा पट काढणारच, असे खुले आव्हान कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. मनोज घोरपडे यांनी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना दिले आहे.
नागझरी ता. कोरेगाव ग्रामस्थांच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात आ. घोरपडे बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा संयोजक सुनील काटकर, भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, माजी कृषी सभापती भीमराव पाटील, ज्येष्ठ नेते व्यंकटराव आप्पा नलावडे, ज्येष्ठ नेते शंकरराव भोसले पाटील, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने, पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र घाडगे, विकास अण्णा गायकवाड, माजी सरपंच आर. आर. फडतरे, विकास भोसले, उपसरपंच विश्वास भोसले अण्णासो भोसले, पै. सोमनाथ भोसले यांची व्यासपीठावर उपस्थित होती.
आमदार मनोज घोरपडे म्हणाले, सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात सत्ताधाऱ्यांनी चालविलेला मनमानी कारभार संपविण्यासाठी सभासदांनी आता जोरदार मोहीम सुरू केली आहे. ज्या पद्धतीने विधानसभेला जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती, तसेच कारखाना निवडणुकीमध्ये सुद्धा सभासद ही निवडणूक हातात घेऊन सर्वसामान्य घरातील संचालक व चेअरमन या कारखान्यावर राहातील.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पंचवीस वर्षाची सत्ता उलटवून टाकण्याचे काम जनतेने केले आहे. आता खऱ्या अर्थाने कराड उत्तरच्या विकास पर्वाला सुरुवात झाली असून नागझरी गावचा पाणी प्रश्न देखील सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. येत्या सहा महिन्यात नागझरी गावाला पाणी देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्नशील राहणार असून उरमोडी जलसिंचन योजनेतूनच पाणी आपल्या गावाला देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी आ. मनोज घोरपडे युवा मंच व स्वाभिमानी महिला मंचने आ. मनोज घोरपडे यांचा चांदीची गदा देऊन भव्य नागरी सत्कार केला. यावेळी वाठार किरोली गटातील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
दीपक साबळे यांनी सूत्रसंचालन केले. विकास भोसले यांनी प्रास्ताविक केले. सौ. रसिका भोसले यांनी आभार मानले.





