मांढरदेव : मांढरदेवला भोर आणि वाईला जोडणाऱ्या घाटांमधील रस्त्यावर काल गुरुवारी रात्रीच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या दरडी रात्री कोसळल्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले तीर्थक्षेत्र मांढरदेव या ठिकाणाला जोडणाऱ्या भोर आणि वाई या दोन्ही घाट रस्त्याचे रुंदीकरणाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. देवीवर श्रद्धा असल्याने येणाऱ्या भाविकांची संख्या या रस्त्याने जास्त प्रमाणात येत असते. या दोन्ही घाटांचे काम करत असताना रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणावरील डोंगर भाग तोडण्यात आला आहे. ते तोडत असताना बऱ्याच ठिकाणी वाहन धारकांना वाहन चालविताना अतिशय घातक अशा स्वरुपात तोडला गेला आहे. त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याची शक्यता असल्याची बातमी दैनिक प्रभातमध्ये गेल्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध झाली होती. काम करत असताना संबंधित कंत्राटदाराकडून दरड न कोसळण्याची कोणतीच दक्षता घेतली नसल्याचे निदर्शनास येत आहे. दरडी कोसळल्यानंतर त्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या अनेक वाहनांचे नुकसान किंवा जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मांढरदेव परिसरामध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामध्ये अनेक ठिकाणच्या दरडी कोसळल्या. सुदैवाने या दरडी रात्री कोसळल्यामुळे त्यामध्ये कोणतेही नुकसान किंवा हानी झालेली नाही. पावसाळ्यामध्ये तर मांढरदेव परिसरामध्ये मुसळधार पाऊस होत असतो. आणि त्यामध्ये अशा अनेक घटना घडण्याची दाट शक्यता असल्याने संबंधित ठेकेदाराने पावसात प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणी दूर करून घाट वाहतुकीसाठी सुरक्षित करून देण्यात यावा, अशी मागणी घाट रस्त्याने प्रवास करणाऱ्या स्थानिक लोकांकडून व भाविकांकडून केली जात आहे.