Satara : वाढता वाढता वाढे सातारा पालिकेचा महसूल

सातारा : सातारा पालिकेने हद्दवाढ जाहीर झाल्यापासून वेगवेगळ्या सुविधांच्या माध्यमातून पालिकेचा महसूल कसा वाढेल आणि खर्चाची बचत कशी होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे. यंदाच्या घरपट्टी वसुलीमध्ये तब्बल 12 टक्के वाढ झाली आहे. तर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सातारा पालिकेची पाच कोटी रुपये वीज बिलाची बचत होणार आहे. याशिवाय स्वीपिंग मशीन, बारकोड स्कॅन, माय सातारा ॲप या माध्यमातून पालिकेने जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
सातारा पालिकेत गेल्या साडेतीन वर्षापासून प्रशासक राज आहे. प्रशासनाने शहरातील नागरिकांच्या सुविधांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. यामध्ये पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यासाठी बिलावर बारकोड स्कॅन देण्यात आला असून माय सातारा ॲप सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे कागदाची बचत होणार असून सुमारे पावणेदोन- दोन लाखांची स्टेशनरी वाचणार आहे. माय सातारा ॲपच्या माध्यमातून सातारकर ऑनलाइन बिल भरू शकणार आहेत.
सातारा पालिकेने सौर ऊर्जा प्रकल्पावर विशेष लक्ष दिले असून सोनगाव कचरा डेपोमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे 12 सोलर उभे राहत आहेत. यामुळे सातारा पालिकेची वीज बिलांची पाच कोटींची बचत होणार आहे. तसेच पॉवर हाऊस येथे दीड मेगावॅटचा वीज जनरेशन प्लांट उभा केला जाणार आहे. त्यामुळे शहराच्या काही भागाला सातारा पालिका स्वतः वीज पुरवणार आहे. शहापूर पाणी योजनेचे तब्बल नऊ लाख रुपये प्रमाणे वर्षाचे सव्वा कोटी रुपयांचे बिल वाचणार आहे. सातारा पालिकेने हद्दवाढ झाली तरी आकृतीबंधातील मर्यादेमुळे कर्मचारी वाढलेले नाहीत. त्यामुळे स्वच्छता विभागाला स्वीपिंग मशीन, हायड्रोलिक डंपर अशा आधुनिक सुविधा घेतल्या आहेत. त्यामुळे झाडू हातात घेणाऱ्या मावशींचा ताण आता कमी होणार आहे. तसेच घंटागाड्यांच्या हायड्रोलिक सुविधा तसेच त्याच्या देखभाल दुरुस्तीतही विशेष लक्ष घालण्यात आले असून तेथेही महसुलाची बचत होईल. यावर बापट साहेबांनी लक्ष दिले आहे.
भविष्यात घरपट्टीचा महसूल वाढणार
पालिकेने 2025- 26 मध्ये 26 कोटी 70 लाख रुपयांची वसुली केली आहे. ही वसुली गतवर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल १२ टक्के जास्त आहे. हद्दवाढ क्षेत्रात सामील झालेल्या भागाला घरपट्टी देताना टप्प्याटप्प्यांने ती वाढवली जाणार आहे. काही वर्षाची सवलत झाल्यानंतर हद्दवाढ क्षेत्रातील भागाचा घरपट्टीचा महसूल तब्बल साडेसात कोटींनी वाढणार आहे. सातारा पालिका सुरुवातीला आठ चौरस किलोमीटर क्षेत्रात वसली होती. मात्र, शहराची हद्दवाढ जाहीर झाल्यानंतर त्याचा पसारा 26 चौरस किलोमीटरपर्यंत वाढला आहे.
ऩाट्यगृह, स्विमिंग टँकमधून
पालिकेला मिळणार महसूल
शाहूपुरी परिसरामध्ये नवीन नाट्यगृह, स्विमिंग टॅंक तसेच 50 बागांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या तिन्ही सुविधांच्या माध्यमातून पालिकेला किमान वर्षाला दीड ते दोन कोटी रुपयांचा महसूल मिळेल असा अंदाज आहे. याशिवाय पालिकेने सहा मालमत्तांचे मूल्यांकन करून लिलाव भाडे प्रक्रिया राबवण्याची तयारी चालवली आहे. दरवेळेला लोक वर्गणीसाठी सातारा पालिकेला बरीच यातायात करावी लागते. मात्र, हा महसूल लोकवर्गणीसाठी वापरता येईल अशी योजना प्रशासनाने तयार केली आहे.





