Satara : ओझर्डेच्या विद्यामंदिरामध्ये मोफत नेत्र तपासणीला प्रतिसाद

वाई : कोल्हापूरची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथील लायन्स नॅब आय हॉस्पिटलच्यावतीने ओझर्डे येथील पतित पावन विद्यामंदिरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानशिदोरी दिनाचे औचित्य साधून या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
स्वामी विवेकानंद, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विवेकानंद पतसंस्थेचे संचालक सचिन माने यांनी प्रास्ताविक केले. ही प्रशाला वाई तालुक्यामध्ये सर्व बाबतीत उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधेबरोबरच विविध उपक्रम राबवून सामाजिक उत्तरदायित्वाचे भान राखणारी एक आदर्श प्रशाला आहे, असे मत प्रतापसिंह पिसाळ यांनी व्यक्त केले. मुख्याध्यापक गिरीश गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रशालेत झालेल्या भौतिक सुविधा व शैक्षणिक बदलांची माहिती देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
या शिबिरामध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने नेत्र तपासणी करण्यात आली. प्रशालेतील 216 विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात लायन्स नॅब आय हॉस्पिटल साताराच्या सौ. अस्मिता सोनटक्के, योगिता मोरे, नीलम निकम व धनराज साळुंखे यांनी नेत्र तपासणी करून विद्यार्थी व लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. याच समारंभात लायन्स नॅब संस्थेमार्फत देण्यात आलेले प्रमाणपत्र मुख्याध्यापक गिरीश गायकवाड यांनी स्वीकारले. अंध निधी जमा केल्याबाबत 50 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून ए व बी श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. सौ. प्रतिभा बेलोशे यांनी सूत्रसंचालन केले. सहशिक्षक डॉ. सुनील फरांदे यांनी आभार मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक मजीद मुकादम, समीर आतार, रवींद्र राठोड, नेत्रा सोनावणे, सौ. धनश्री भगत व सागर पुजारी यांनी परिश्रम घेतले.





