सातारा : मातंग समाजाच्या मागण्यांबाबत आंदोलनाला रासपचा पाठिंबा

सातारा : मुंबईतील आझाद मैदानात मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी सातारा जिल्ह्यातील लोधवडे येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन कांबळे 18 डिसेंबर 2023 पासून उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या तसेच आंदोलनाला सातारा लोकसभा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष उमेश चव्हाण व डॉ. रमाकांत साठे यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना प्रजासत्ताकदिनी निवेदन देवून या उपोषण आंदोलनाबाबत मोहन कांबळे यांना न्याय देण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, मोहन कांबळे उपोषणास बसलेले असून याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातंग समाजाच्या बाबतीत असलेले प्रश्न तात्काळ सोडविण्याबाबत कारवाई करावी व कांबळे यांचे आमरण उपोषण तात्काळ थांबवावे व मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याबाबत असा कायदा करावा.
गेले अनेक वर्षापासून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं म्हणून अनेक संघटना व पक्ष मातंग समाजाच्या नेते प्रयत्न करीत आहेत मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.
मातंग समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिले मात्र त्याचा लाभ मराठा पुढार्यांनी सत्तेत असताना मिळून दिला नाही. आजपर्यंत मराठा समाजाच्या पुढार्यांना निवडून देत आलो आहोत. मात्र मातंग समाज सत्तेपासून दुर्लक्षित आहे म्हणून मोहन कांबळे यांच्या आंदोलनास सातारा जिल्ह्यातील संपूर्ण मातंग समाज उभा राहील.





