Satara : रामराजे आज तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आ. रामराजे नाइक निंबाळकर शिर्डी अधिवेशन व मुंबई येथील बैठकीस उपस्थित होते. आज तरी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत. मात्र, ते राहतील की नाही हे तुम्हीच विचारा, अशी प्रतिक्रिया खासदार नितीन पाटील यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सभासद नोंदणी अभियान राबवण्यात येत असल्याचे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) जिल्हा कार्यालयात आयोजित पदाधिकारी मेळाव्यानंतर खा. पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आ. सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा नूतन कार्याध्यक्ष संजय देसाई, जिल्हा बॅंकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे नूतन फलटण तालुकाध्यक्ष शिवरुपराजे खर्डेकर, माजी सभापती मंगेश धुमाळ, सरचिटणीस निवास शिंदे उपस्थित होते. आ. रामराजे आजच्या बैठकीला अनुपस्थित असल्याबाबत खा. पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, रामराजे ना. निंबाळकर पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.
शिर्डी येथे व मुंबईतील बैठकीला ते उपस्थित होते. मी पण त्यांच्यासमवेत बैठकीला होतो. या बैठकीत जिल्ह्यात पक्ष बळकटी करणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या आहेत. आज तरी रामराजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून ते पक्षात राहतील की नाही ते त्यांनाच विचारा, अशा शब्दांत रामराजेंच्या अनुपस्थितीबाबत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पदाधिकारी निवडीबाबत अजित पवार यांनी सूचना केल्या होत्या. त्यामुळे अजित पवार यांची रामराजेंशी चर्चा झाली की नाही हे आपणास माहित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खा. नितीन पाटील म्हणाले, जिल्ह्यात पक्षाची मजबूत बांधणी करण्यात येत आहे. अजित पवार यांच्या सुचनेनुसार काही पदाधिकारी निवडी झाल्या असून आगामी आठ ते दहा दिवसांत आणखी निवडी होणार आहेत. पक्षाची सभासद नोंदणी सुरु करण्यात आली असून जिल्हाभर मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत न्यायालयात फेब्रुवारी महिन्यात सुनावणी आहे. त्यानंतर या निवडणुका होण्याची शक्यता असून साधारणत: मे महिन्यात निवडणुका होतील. महायुती म्हणून लढलाे तर एकत्र नाही तर आम्ही स्वतंत्र लढूनही पक्षाची ताकद दाखवू शकतो. मात्र, याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. लाेकसभा निवडणुकीत पक्षाकडून खा. उदयनराजेंचे काम प्रामाणिकपणे झाले.
विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात चांगले काम झाले असून पक्षाच्या दोन्ही जागा मताधिक्याने विजयी झाल्या. आगामी काळात पक्षाच्यावतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळणार असून अनेक जण पक्षात सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मूळ भाजपचे तरी सचिन पाटील राष्ट्रवादीचेच
फलटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन पाटील मताधिक्क्याने विजयी झाले. श्री. पाटील हे निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये होते. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. फलटण तालुकाध्यक्ष पदावर शिवरुपराजे खर्डेकर यांची निवड ही सचिन पाटील यांच्या शिफारशीवरच झाली आहे. त्यामुळे सचिन पाटील मूळचे भाजपचे असले तरी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या आमदार आहेत. त्यांच्या नेतृत्वात तालुक्यात पक्षाची मजबूत बांधणी करण्यात येणार असल्याचे खा. नितीन पाटील यांनी स्पष्ट केले.





