Satara : परळीच्या प्रणव कुलकर्णी यांचा ‘यूपीएससी’ त झेंडा

सातारा : परळी (ता. सातारा) येथील प्रणव विनय कुलकर्णी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेमध्ये भारतातून 256 वा क्रमांक मिळवत धवल यश मिळवले आहे. त्याच्या या यशाचे सातारा जिल्ह्याच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. निकाल समजतात प्रणवने दिल्लीतून आपल्या वडिलांना या सुखद यशाची वार्ता कळवली.
मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल प्रणवला जाहीर झाला. त्यात साडेसात लाख विद्यार्थ्यांमधून 1009 जणांनी यश प्राप्त केले. शहरालगतच्या परळी गावातील प्रणव कुलकर्णी यांनी 256 वा क्रमांक मिळवला. प्रणव यांनी गेल्या वर्षीसुद्धा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र, मुलाखत आवेदन प्रक्रियेतून त्याला यशाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. यापूर्वी त्याने सीडीएस परीक्षेसाठी दोन वेळा प्रयत्न करून त्यातही यश मिळवले होते.
विनयचे प्राथमिक शिक्षण सातारा इंग्लिश मीडियम स्कूलमधून तर सातवी ते बारावी शिक्षण पोदार इंटरनॅशनल स्कूलमधून झाले. त्यानंतर त्यांनी सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून माहिती व तंत्रज्ञान विषयात पदवी मिळवली. त्याचवेळी त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा सराव सुरु ठेवला होता. पुस्तकांचे वाचन आणि जास्तीत जास्त सराव हे त्याच्या अभ्यासाचे प्रमुख सूत्र होते, असे आपल्या यशाचे रहस्य दिल्लीतून पत्रकारांना सांगितले.
प्रणवचे वडील विनय कुलकर्णी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या पोवई नाका येथील शाखेमध्ये ऑपरेटर म्हणून नोकरीला आहेत. तर आई गृहिणी आहे. विनय कुलकर्णी दांपत्याचा एकुलता एक मुलगा आहे. प्रणवने दुपारी अडीच वाजता या यशाची बातमी वडिलांना दिल्यानंतर त्यांना आभाळ ठेंगणे झाले. साताऱ्यात प्रणवच्या या यशाची वार्ता पसरतात सर्व स्तरातून त्याच्या या उज्वल यशाच्या अभिनंदन होत आहे.





