Satara Politics : वाईच्या राजकारणात नवा ट्विस्ट! मंत्री जयकुमार गोरेंच्या एन्ट्रीने मकरंद पाटील गटात खळबळ?

प्रभात वृत्तसेवा
सातारा – नगरपालिका अन् नगरपंचायतींच्या निवडणुका तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी सुरभी भोसले यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या साथीने मतपेरणीसाठी सुरुवात केली आहे. त्यामुळे वाई मतदारसंघातील निवडणुकांमध्ये मोठी चुरस पहायला मिळणार आहे.मतदारसंघातील वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर या पालिकांसाठी निवडणुका होत आहेत. त्यासाठी मंत्री मकरंद पाटील यांच्या गटाकडून सत्ता राखण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे.
त्याचबरोबर विरोधी मदन भोसले गटाकडूनही सध्या बेरेजेचे राजकारण सुरु आहे. मकरंद पाटील यांना मिळालेले मंत्रिपद, त्यानंतर त्यांचे बंधू नितीन पाटील यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आणि नंतर राज्यसभेची खासदारकी यामुळे मतदारसंघात अंतर्गत नाराजी वाढल्याचे चित्र आहे. त्याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये बसण्याची शक्यता ओळखून मदन भोसले यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष व मदन भोसले यांच्या कन्या डॉ. सुरभी भोसले यांनी मतदारसंघात स्वत:चे राजकीय अस्तित्व निर्माण केले आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी सोडण्यासाठी सुरभी भोसले सध्या सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये त्यांनी वाढवलेला संपर्काची आगामी काळात त्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे.
बेरीज आणि नाराजी…
वाई मतदारसंघात बेरेजेचे राजकारण करण्याचा मकरंद पाटील यांनी प्रयत्न केला आहे. याचा त्यांच्या राजकारणाला फायदा झाला मात्र , त्याचवेळी नाराजांचा मोठा गट निर्माण झाला आहे. अनिल सावंत यांनी केलेला भाजप प्रवेश हा त्याचे द्योतक मानले जात आहे.
जयाभाऊंचे वाढते दौरे परिणामकारक?
मंत्री जयकुमार गोरे यांचे वाई विधानसभा मतदार संघातील दौर गेल्या काही महिन्यांमध्ये वाढले आहेत. फक्त दौरे न करता काही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये मतदारसंघात विकासाची घोडदौड अपेक्षेप्रमाणे न झाल्याची टीका करत त्यांनी थेट मकरंद पाटील यांच्यावरच निशाणा साधला होता. त्यानंतर मकरंद पाटील यांनीही माण तालुक्यातील कार्यक्रमात जयकुमार गोरे यांच्यावर टीका करुन त्यांना प्रत्युत्तर दिले होते.
त्यानंतर काहीकाळ या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरु झाल्याचे चित्र होते. सध्या या दोघांमधील शीतयुद्ध थांबलेले असले तरी वाई मतदारसंघातील नगरपालिका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांवर त्याचा परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे.





