शिक्रापूरमध्ये थरार..! अट्टल गुंडांवर सातारा पोलिसांचा गोळीबार; आरोपी जखमी, दोघे फरार

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात आज सकाळी पोलिस व आरोपींमध्ये थरारक धुमश्चक्री झाली. सोनसाखळी चोरीतील आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या सातारा पोलिसांच्या पथकावर आरोपींनी प्रतिकार करत चाकूने हल्ला केला. स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात लखन भोसले हा आरोपी जखमी झाला असून त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनसाखळी चोरीतील तिघा आरोपींवर पोलिसांची नजर होती. त्यांना पकडण्यासाठी सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूर परिसरात गेले. त्यावेळी आरोपी लखन जाधव उर्फ भोसले याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केला. या अचानक हल्ल्यामुळे पोलिसांना स्वसंरक्षणार्थ गोळी झाडावी लागली. गोळी आरोपीच्या कमरेत लागल्याने तो गंभीर जखमी झाला.
दरम्यान, या झटापटीत इतर दोन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. शिक्रापूर परिसरात अचानक झालेल्या या घटनेमुळे काही काळ खळबळ उडाली होती.





