Satara : निधी अखर्चित राहू नये यासाठी नियोजन करा

सातारा : जिल्हा नियोजन समितीसह विविध माध्यमातून मंजूर असलेला निधी मार्चअखेर खर्च होण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी नियोजन करावे. गावोगावी होत असलेली विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत, यासाठी अधिकार्यांनी क्षेत्र भेटी देऊन, कामांची पाहणी करावी, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी ठराव समिती सभेत दिल्या.
जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभा स्थायी समिती सभागृहात नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, प्रज्ञा माने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, अमर नलवडे, संजय लाड, अरुणकुमार दिलपाक, कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, प्रभावती कोळेकर, समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य विभागाच्या 12 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी पद्धतीने प्रत्येकी आठ कर्मचारी पुरवण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. विजया कन्स्ट्रक्शनची निविदा कमी दराची असल्याने ती मंजूर करण्यात आली. ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत देखभाल व दुरुस्ती निधीतून ग्रामीण भागातील हातपंप दुरुस्तीसाठी आठ वाहनचालक व सहा मदतनीस बाह्ययंत्रणेद्वारे नेमण्यास मंजुरी देण्यात आली. या सभेत विषयपत्रिकेसह ऐनवेळच्या विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.
नागराजन यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेतला. अनेक विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असल्याने, ही कामे लवकरात लवकर सुरू करावीत. 31 मार्चपर्यंत जास्तीत जास्त निधी खर्च होण्यासाठी प्रयत्न करावेत. निधी शिल्लक राहता कामा नये. विविध योजनांमधून आलेला निधी वेळेत खर्च करण्याचे नियोजन सर्व विभागांनी करावे. गावोगावी सुरू असलेली कामे चांगल्या दर्जाची व्हावीत, यासाठी अधिकार्यांनी या कामांची पाहणी करावी, अशा सूचना नागराजन यांनी दिल्या. नीलेश घुले यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले.





