सातारा – क्रिकेट स्पर्धेत फलटण पत्रकार संघ विजेता

फलटण – मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त झालेल्या शिवसंदेशकार, माजी आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत फलटण पत्रकार संघाने कॉ . हरिभाऊ निंबाळकर चषकावर नाव कोरले.
येथील मुधोजी क्लब मैदानावर दि. १० आणि ११ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात स्पर्धा झाल्या. मराठी पञकार परिषदेने फलटणमधील राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आणि अधिकाऱयांना एकत्र करुन किक्रेट स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगले वातावरण निर्माण करण्याची १४ वर्षाची परंपरा कौतुकास्पद असल्याचे मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे- पाटील, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक- निंबाळकर , युवा नेते सह्याद्री कदम, प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, तहसीलदार अभिजित जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी सुहास रणसिंग, मुख्याधिकारी संजय गायकवाड, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सुनील महाङिक, जयकुमार शिंदे, अशोकराव जाधव, डॉ. प्रसाद जोशी, बजरंग गावडे, महेंद्र सूर्यवंशी- बेडके, पंकज पवार, ङॉ. कोंङके आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रांरभी मान्यवरांच्या हस्ते बाळशाञी जांभेकर आणि कॉ . हरिभाऊ निंबाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. दुपारच्या सञात खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी तुफान फटकेबाजी करीत क्रिकेटचा आनंद घेतला. अप्पर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्पर्धेला भेट देऊन समाधान व्यक्त केले. महिला पोलीस आणि फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनी यांच्या प्रदर्शनीय सामन्यात फार्मसी कॉलेजने सामना जिंकला. सदगुरु उद्योग समूह संघ उपविजेता ठरला. फलटण एज्युकेशन, नगरपरिषद, वकिल, बिल्डर असोसिएशन, क्रेडाई, महसूल कर्मचारी, कृषी कर्मचारी, शहर व ग्रामीण पोलीस ठाणे, पत्रकार संघ, सदगुरु आदी सुमारे १६ संघांनी सहभाग नोंदविला.
अंतिम सामना फलटण पत्रकार संघ विरुध्द सदगुरु उद्योग समूह संघ यांच्यात मोठ्या चुरशीने व अटीतटीने झाला. त्यामध्ये फलटण पत्रकार संघ विजेता आणि सदगुरु संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक नगरपरिषद तर तृतीय क्रमांक बिल्डर्स असोशिएशनने पटकवला. मॅन ऑफ द मॅच शक्ती भोसले, मॅन ऑफ द सिरीज सुनील घोलप, बेस्ट बॅट्समन सम्राट भोसले, बेस्ट बोलर सुरज होले यांनी बक्षीस मिळवले. फलटणची पत्रकारिता समाजाभिमुख आहे, असे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी पारितोषिक वितरण समारंभात सांगितले.
स्पर्धेसाठी स्कोअरर म्हणून सुनील साळवी यांनी तर पंच म्हणून भारत अहिवळे, करण भोसले, सुधीर पाटील, विशाल अहिवळे, केतन सोरटे, अमोल गायकवाड यांचे सहकार्य लाभले. समालोचक म्हणून मेजर गुळदगड आणि स्वरुप अहिवळे यांनी काम पाहिले. संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मुधोजी क्लब मैदान उपलब्ध करुन दिले. माजी उपनगराध्यक्ष सुनील मठपती, सदगुरु हरिबुवा पतसंस्थेचे व्यवस्थापक जगताप यांच्यासह शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, क्रिकेटप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





