Satara : ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’द्वारे ऐतिहासिक स्थळांच्या पर्यटनाची संधी

सातारा : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसीटी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. ही यात्रा ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ अंतर्गत ९ जूनपासून सुरू होत आहे. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
या पाच दिवसांच्या विशेष प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारित कार्यक्रम असणार आहेत. भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. याबाबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात्रेदरम्यान गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटकांना आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत.
या सहलीसाठी विविध पॅकेजेस तयार करण्यात आली असून सोयीनुसार इकोनॉमी (एसएल), कम्फर्ट (३ एसी), सुपीरिअर (२ एसी) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे. या पॅकेजबाबत आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
या पॅकेजमध्ये भारत गौरव ट्रेनने प्रवास, वातानुकूलित/ विनावातानुकूलित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड, ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन, प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी) आणि सुरक्षा व्यवस्था या सेवा समाविष्ट आहेत. साहसी खेळ, बोटिंग इत्यादी सेवा पॅकेजमध्ये नाहीत. खोलीतील सेवांसाठी वेगळी रक्कम आकारली जाईल.
इतर कोणताही वैयक्तिक खर्च, कोणतेही अतिरिक्त पर्यटन स्थळ हा खर्चही पॅकेजमध्ये नाही. सहलीतील पहिल्या दिवशी मुंबई- रायगड– पुणे असा प्रवास होईल. दुसरा दिवस : पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती). तिसरा दिवस : शिवनेरी- भीमाशंकर- पुणे. चौथा दिवस : प्रतापगड- कोल्हापूर. पाचवा दिवस : कोल्हापूर- महालक्ष्मी मंदिर- पन्हाळा किल्ला- मुंबई. सहावा दिवशी सकाळी मुंबईत सहलीची समाप्ती होईल. आरक्षण व अधिक माहितीसाठी www.irctctourism.com संकेतस्थळवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही ठिकाणे पाहता येणार…
छत्रपती शिवाजी महाराज सर्किट या नावाने सुरु होणारा या सहलीचा कालावधी ५ / ६ दिवसांची आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन प्रवास सुरु होईल व संपेल. मुंबई (सीएसएमटी)- रायगड- पुणे- शिवनेरी- भीमाशंकर- प्रतापगड- कोल्हापूर- पन्हाळा परत मुंबई असा सहलीचा प्रवासमार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला व राजधानी असलेला रायगड किल्ला, छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण गेले तो पुण्याचा लाल महाल, पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय शिवसृष्टी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ भीमाशंकर ज्योतिर्लिंग. अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण प्रतापगड किल्ला, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक पन्हाळगड ही ठिकाणे सहलीमध्ये पाहता येणार आहेत.





