Satara News : ‘आरटीओ’च्या कार्यालयातील रिक्त पदांमुळे कामे संथगतीने

सातारा : प्रादेशिक परिवहन कार्यालयात (प्रशासकीय) ‘अ’ संवर्गातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची एक, , ‘ब’मधील मोटार वाहन निरीक्षक पदाच्या ७ जागा रिक्त असल्याने कामाची गती वाढणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांच्या कामाला गती मिळत नसून उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणीपासून वाहन परवाना, वाहन तपासणी व प्रमाणन, कर आकारणी व वसुली, वाहतूक नियमांचे पालन व प्रमाणपत्र देण्याची काम केली जातात. रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती व सुरक्षा उपक्रमांचे आयोजनही केले जाते.
काही महिन्यांपूर्वी कराड, फलटण या ठिकाणी उपप्रादेशिक कार्यालय सुरू झाले आहे. या तिन्ही कार्यालयात दररोज अनेक नागरिक वाहन परवान्यासह नवीन वाहन नोंदणी, परनावा, वाहनाची मालकी बदलणे, नोंदणी नूतनीकरण, वाहन रद्द करण्यासह वाहनासाठी विशिष्ट क्रमांक घेण्यासाठी येतात. मात्र, रिक्त पदांमुळे अनेक कामांना गती मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना त्यातून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.





