Satara News: समाधीचा माळ परिसरात पाणीटंचाई! संतप्त महिलांचा पालिकेत मोर्चा, नक्की काय आहे प्रकरण?
Satara News: नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट होऊनही समाधीचा माळ परिसरातील मूलभूत प्रश्न सुटेना; गेल्या काही आठवड्यांपासून नागरिक पाण्यासाठी हवालदिल.

Satara News – शहरातील समाधीचा माळ परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून निर्माण झालेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील महिलांनी बुधवारी सातारा नगरपालिकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेत पाणीटंचाईबाबतची व्यथा मांडली. नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, समाधीचा माळ परिसराचा नगरपालिकेच्या हद्दीत समावेश झाल्यानंतरही अनेक मूलभूत सुविधांबाबत अपेक्षित सुधारणा झालेल्या नाहीत. विशेषतः पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांनी यापूर्वीही संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र, विविध यंत्रणांकडून जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याने प्रश्न कायम असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
पालिकेतील अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडताना महिलांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. दररोजच्या गरजांसाठी पामी मिळत नसून पाण्यावर अवलंबून असल्यामुळे कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, परिसरातील लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाकडे अधिक लक्ष देऊन नागरिकांशी संवाद साधावा, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली. पाणीटंचाईचा प्रश्न लवकर मार्गी लागला नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला.
हद्दवाढीनंतरही प्रश्न कायमच
समाधीचा माळ परिसर नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर नागरिकांना नागरी सुविधा अधिक सक्षमपणे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सेवांबाबत अजूनही अडचणी कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी समन्वय साधून प्रश्नाचे कायमस्वरूपी निराकरण करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.





