Satara News : एकल महिला दिनानिमित्त महाबळेश्वरमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
महिला व बालविकास विभागाच्या निर्देशानुसार एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी (Satara News) शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे.

Satara News : महिला व बालविकास विभाग, पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय तसेच (Satara News) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिला दिनानिमित्त उद्या दि. 23 रोजी दुपारी 12 वाजता येथील खादी ग्रामोद्योग मधसंचनालयात एकल महिलांसाठी तालुकास्तरावर विविध जनजागृती, सक्षमीकरण व लाभवितरण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला व बालविकास विभागाच्या निर्देशानुसार एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी (Satara News) शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे. तसेच एकल महिलांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमादरम्यान आधार कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, विविध शासकीय दाखले, अंगणवाडी सेवांचा लाभ, स्वयंसहाय्यता बचत गटांमध्ये सहभाग, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, महिला सक्षमीकरण योजनांची माहिती तसेच उमेद अभियानांतर्गत उपलब्ध विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकल महिलांच्या यशोगाथांचा गौरवही करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी (Satara News) तहसीलदार कार्यालयात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस तहसीलदार सचिन मस्के यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील एकल महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि स्वतःचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण साधावे, असे आवाहन यावेळी सर्व विभाग प्रमुखांनी केले.
एकल महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, स्वावलंबनाला चालना देणे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.एकल महिलांनी उपक्रमाला उपस्थित राहून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती, तहसील कार्यालय, महिला व बालविकास विभाग आणि उमेद अभियानाच्यावतीने करण्यात आले आहे.






