Satara News – अमेरिका-इस्त्राइल- इराक युद्धाच्या पार्श्वभूमीवर पीएनजी गॅस वापरण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी सातारा शहरात अजून या पाइपलाइनचाच पत्ता नाही. तर हा गॅस मिळणार कसा असा प्रश्न सातारकरांना पडला आहे. स्वच्छ इंधन, सुरक्षित पुरवठा आणि स्वयंपाकातील सोय या तिन्ही गोष्टींचा लाभ देणारी पाईप नॅचरल गॅस (पीएनजी) योजना साताऱ्यात प्रत्यक्षात उतरण्याआधीच रेंगाळल्याचे चित्र अनेक वर्षांपासून आहे. पीएनजीद्वारे गॅसपुरवठा करण्याबाबत केंद्र सरकारने देशातील शहरांची पहिल्यांदा यादी जाहीर केली, त्या यादीमध्ये सातारा शहराचा समावेश होता. त्याला सुमारे दहा वर्षाहून अदिक काळ लोटला आहे. प्रत्यक्षात महामार्गाच्या अलिकडे म्हणजे सातारा नगरपालिका क्षेत्रात पाइपलाइनचा पत्ताच नाही. या योजनेकडे तसे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. आणि आता युद्धाच्या परिस्थितीत एलपीजी गॅसची समस्या उभी राहणार हे लक्षात आल्यावर पूएनजी गॅस वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आता तरी या पाइपलाइनचे काम जलद गतीने व्हावे अशी अपेक्षा केली तर ती वावगी ठरु नये. महामार्गापुरतेच मर्यादित काम पुणे- बंगळुरु महामार्गावरील शिवराज पेट्रोल पंप तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती प्रस्तावित इमारतीच्या पिछाडीला काही ग्रामपंचायत क्षेत्रातच राष्ट्रीय महामार्गालगत पाइपलाइन टाकण्याचे काम काही प्रमाणात पूर्ण झाले आहे. तरी शहराच्या मुख्य रस्त्यांमध्ये, उपनगरांत आणि वाढत्या गृहनिर्माण प्रकल्पांपर्यंत पीएमजीचे नेटवर्क पोहोचलेले नाही. परिणामी, योजनेचा लाभ मर्यादित भागापुरताच अडकून पडला आहे. गॅस सिलिंडर टंचाई प्रशासन-ठेकेदार समन्वयाचा अभाव योजनेच्या विलंबामागे स्थानिक प्रशासन, नगरपालिका आणि गॅस वितरण कंपनी यांच्यातील समन्वयाचा अभाव हे प्रमुख कारण मानले जाते. रस्ते खोदकामासाठी परवानग्या, वाहतूक व्यवस्थापन आणि कामानंतर रस्त्यांची दुरुस्ती या मुद्द्यांवर सतत अडथळे येत आहेत. वारंवार खोदकामामुळे नागरिकांचा त्रास होत राहतो. ज्या भागात काम सुरू आहे, तिथे वारंवार रस्ते खोदले जात असल्याने वाहतूक कोंडी आणि धुळीचा त्रास वाढतो. व्यापाऱ्यांना व्यवसायात अडथळे येत असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असते. त्यामुळे प्रशासनावर काम लवकर पूर्ण करण्यासाठी दबाव वाढत आहे. स्थानिक पातळीवर या योजनेला गती देण्यासाठी आवश्यक ती राजकीय इच्छाशक्ती दिसून येत नसल्याची टीका होत आहे. विविध विकास प्रकल्पांना प्राधान्य दिले जात असताना दीर्घकालीन फायदे देणारी पाईप गॅस योजना मात्र दुर्लक्षित राहिल्याचे चित्र आहे. चांगल्या योजनेचा उद्देश हरवला पाईप गॅस योजना ही साताऱ्याच्या शहरी विकासासाठी महत्त्वाची पायरी ठरू शकते. मात्र, सध्याच्या घडीला ही योजना महामार्गापुरतीच मर्यादित राहिल्याने तिचा मूळ उद्देशच हरवत चालला आहे. प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेतले नाहीत तर साताऱ्याचा आधुनिक आणि पर्यावरणपूरक शहराचा प्रवास आणखी लांबणीवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.