– विजय लाड कोयनानगर : आंबेघर, मिरगाव- ढोकावळे, हुंबरळी या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावांमध्ये २०२१ मध्ये झालेल्या भूस्खलनाने अनेकांच्या आयुष्याला हादरा दिला होता. आपल्या घरादारासह आप्तेष्टांनाही गमावलेली ५४० कुटुंबे आजही त्या घटनेच्या जखमा उरात घेऊन जगत आहेत. त्या वेदना शब्दांत व्यक्त होणाऱ्या नाहीत, पण आता या कुटुंबांसाठी दिलासा देणारी सकारात्मक बातमी आहे. त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार आहे. पाटण तालुक्यात चार वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोरणा खोऱ्यातील आंबेघर खालचे, आंबेघर वरचे तर कोयना विभागातील मिरगाव- ढोकावळे हुंबरळी या गावांमध्ये दरडी कोसळून संपूर्ण वस्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. अनेकांनी आपले प्राण गमावले. तर शेकडो कुटुंबे बेघर झाली. त्या वेळी तात्पुरते निवारे उभारण्यात आले होते. परंतु, कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित होता. पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बेघर असणाऱ्या दरडग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्धार व्यक्त करून तत्कालीन शिंदे सरकार कडून त्यासाठी भरीव निधीची तरतूद सुध्दा केली होती. आजही त्या घटनेत बाधित व बेघर झालेले दरडग्रस्त तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये आठवणींच्या दरडीत आपले आयुष्य ढकलत आहेत. अनेक दरडग्रस्तांनी आपलं अस्तित्व आपल्या गावाच्या ओळखीला वेदनेच्या दरडीतून बाहेर येत नव्या आशेने जगण्याचा निर्णय घेऊन तो अंमलात आणला आहॆ. शासनाने त्यांना नवे हक्काचे घर देण्याचा दिलासा व आशेचा नवीन किरण दिला आहे. चाफेर येथे १०२ अत्याधुनिक डुप्लेक्स घरे आणि देशमुखवाडी (जर्मन टेकडी) येथे उर्वरित घरांची उभारणी केली जाणार आहे. ही घरे केवळ चार भिंतींचा निवारा असणार नाहीत, तर दरडग्रस्तांसाठी ती एक नव्या सुरुवातीची जागा असेल जिथे त्यांना सुरक्षितता, स्थैर्य आणि आपुलकीचा अनुभव येईल. या घरांमध्ये सर्व आधुनिक सुविधा असतील, ज्या त्यांच्या जीवनशैलीला नव्या उंचीवर नेतील. प्रत्येक घरामध्ये त्यांना पुन्हा एकदा आपला संसार थाटता येईल, आठवणींची जपणूक करता येईल, आणि आपल्या आयुष्याला स्थैर्य मिळेल. या प्रकल्पाच्या मागे शासनाचा ठाम पाठिंबा आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नांनी हा प्रकल्प अधिक गतीने पुढे सरकत आहे. शासनाने आर्थिक आणि धोरणात्मक मदत दिल्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी देखील या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. “मिरगाव पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या २.५० एकर जागेसाठी शासन दरबारी प्रस्ताव दिला आहे. लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय होईल,” असे त्यांनी सांगितले. पुनर्वसनाच्या कामाची जबाबदारी टी अँड टी कंपनीकडे सोपवण्यात आली असून, त्यांनी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. लवकरात लवकर दरडग्रस्तांना त्यांचे हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पाची बातमी ऐकताच अनेक दरडग्रस्तांचे डोळे पाणावले. त्यांच्या भावना शब्दांत मांडणं कठीण आहे. एक स्थानिक म्हणाले, “चार वर्षांपासून आम्ही तात्पुरत्या निवाऱ्यात राहतोय. घर नसल्याने काहीतरी अधुरं राहिलं होतं. आता स्वतःच्या घरात राहण्याचं स्वप्न पूर्ण होणार, ही भावना सांगता येणार नाही.” ते घरे त्यांच्यासाठी केवळ चार भिंती आणि एक छत असणार नाहीत, तर पुन्हा एकदा आपलं अस्तित्व साकार करण्याची जागा असणार आहे. या प्रकल्पामुळे नव्या आयुष्याची सुरुवात होऊन दरडग्रस्त कुटुंबांच्या जीवनात नवी उमेद निर्माण झाली आहे. ही घरे त्यांच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहेत. ‘घर’ मिळाल्याने केवळ त्यांना निवारा मिळणार नाही, तर पुन्हा एकदा जगण्याला अर्थ मिळेल, हे निश्चित!’ – शंभूराज देसाई (पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री सातारा)