Satara News : मलवडी-दहिवडी रस्त्यावर भीषण अपघात ! 2 युवकांचा जागीच मृत्यू

दहिवडी : माण तालुक्यातील मलवडी येथून दहिवडीच्या दिशेने जात असताना आंधळी दरम्यान असलेल्या नायरा पेट्रोल पंपाजवळ दुचाकीचे (एमएच ११ सीएफ ८२३९)अचानक नियंत्रण सुटून ती रस्त्यालगतच्या लिंबाच्या झाडावर धडकली. ही घटना सोमवारी सायंकाळी सुमारास सहा वाजता घडली. या भीषण अपघातात चैतन्य दादासो चव्हाण (वय अंदाजे २६ वर्षे,रा. बोथे, ता. माण) आणि आकाश सुरेश लवंगनारे (वय अंदाजे ३० वर्षे, रा. राजापूर, ता. खटाव) या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
घटना समजताच आंधळी गावचे पोलीस पाटील विशाल गुरव तसेच स्थानिक नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका व पोलिसांशी संपर्क साधून मदतकार्याला सुरुवात केली. अपघातस्थळी दहिवडीचे पोलिस उपअधीक्षक रणजित सावंत, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह पोलिस पथकाने भेट देऊन पाहणी केली. जखमींना तात्काळ दवाखान्यात हलवण्यात आले.
मात्र, उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. धडक इतकी भयंकर होती की दुचाकी पूर्णपणे क्षतिग्रस्त झाली असून, दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला.





