Satara News | मराठा आरक्षणास पाठिंबा, पण ओबीसी आरक्षणाला धक्का नको – रामदास आठवले

प्रभात वृत्तसेवा
वाई – खासगी क्षेत्रात आरक्षण, भूमिहीनांना जमीन, मजुरांचे हक्क, शिक्षण व नोकरीत मागासवर्गीयांना आरक्षण अशा मागण्यांसाठी लवकरच देशव्यापी आंदोलन उभारले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाबळेश्वर येथे झालेल्या दोन दिवसीय विचारमंथन शिबिरात अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सौ. सीमाताई आठवले, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, स्वागताध्यक्ष अशोकराव बापू गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
खासगी क्षेत्रात मागासवर्गीयांना आरक्षण लागू करणे, बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन भारतीय बौद्धांच्या ताब्यात देणे, प्रत्येक भूमिहीनाला पाच एकर शेतीयोग्य जमीन मिळावी, मजुरांचे किमान वेतन वाढवावे, कंत्राट पद्धत बंद करून सर्वांना नियमित सेवा द्यावी, अंगणवाडी सेविका व इतर स्वयंसेविकांचे मानधन वाढवावे, स्वायत्त व खाजगी विद्यापीठांमध्ये आरक्षण लागू कराव.
अनुसूचित जाती- जमातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढवावी, महिला आरक्षणाची अंमलबजावणी करावी तसेच राज्यातील खड्डेमुक्ती होईपर्यंत टोल बंद करावा अशा ठरावांवर शिक्कामोर्तब झाले.यावेळी आठवले म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा आहे. मात्र, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
आमचे उद्दिष्ट संघर्ष निर्माण करणे नसून सर्व समाजघटकांचा समान विकास साधणे आहे.’’ या शिबिरात ऋषिकेश कांबळे, डॉ. अच्युत माने, अॅड. अरुण काकडे, प्रा. पुरण मेश्राम, प्रा. डॉ. विजय काळेबाग, प्रा. अमर कांबळे, प्रा. डॉ. विजय मोरे, वैभव काळखेर या साहित्यिक व विचारवंतांचा सहभाग लक्षणीय ठरला. शिबिरास अविनाश महातेकर, गौतम सोनवणे, दयाल बहादुरे, विजय वाकचौरे, शहाजी कांबळे, पप्पू कागदे, सिद्धार्थ कासारे, परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे, उत्तमदादा कांबळे, प्रकाश लोंढे, सौ. शीलाताई गांगुर्डे, सौ. शशिकलाताई वाघमारे, श्रीकांत भालेराव, डॉ. विजय मोरे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.





