Satara News : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे जिल्ह्यात उद्या स्वागत

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांचे शनिवारी (दि. 19) सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून, त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. या स्वागताची जोरदार तयारी राष्ट्रवादी भवनातील बैठकीत करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षाची राज्यातील धुरा आ. शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवली आहे.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते प्रथमच सातारा जिल्ह्यात येणार आहेत. त्यांच्या स्वागताच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी भवनात माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली.
या बैठकीस जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सतीश चव्हाण, अरुण माने, संजना जगदाळे, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, घनश्याम शिंदे, डॉ. नितीन सावंत, बंडू ढमाळ, सुभाष कारंडे, दिलीप बाबर, संगीता साळुंखे, अर्चना देशमुख, समिंद्रा जाधव, नलिनी जाधव, तेजस्विनी केसरकर, सुरेश पार्टे, दिलीप तुपे, शफीक शेख, सचिन जाधव, विजयराव बोबडे, मकरंद बोडके, मोहनराव शिंदे, गोरखनाथ नलावडे, तेजस शिंदे, साहिल शिंदे, पारिजात दळवी, राजाभाऊ जगदाळे, युवराज पवार, संग्राम कदम, अॅड. नीलेश ढेरे, विनायकराव बर्गे, उमेश देशमुख, प्रज्ञा गायकवाड, अमोल पाटोळे, विनायक बर्गे, सुनील सपकाळ, नीलेश जगदाळे, किशोर सोनवणे, बुवासाहेब पिसाळ, अॅड. पांडुरंग भोसले, संतोष पवार, गिरीश फडतरे, शैलजा कदम उपस्थित होत्या.
बाळासाहेब पाटील म्हणाले, पक्षाने संपूर्ण राज्याची जबाबदारी आ. शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवली आहे. ही बाब कार्यकर्त्यांना बळ देणारी आहे. आ. शिंदे यांचे स्वागत उत्साहात करायचे आहे; परंतु उत्साहाच्या भरात पक्षाची शिस्त मोडायची नाही. स्वागतावेळी कोणीही महामार्गावर दुचाकी घेऊन येऊ नये. वाहनांचे कर्णकर्कश्श हॉर्न टाळायचे आहेत. पक्षाची शिस्त पाळूनच रॅली काढण्यात येणार आहे.
आ. शशिकांत शिंदे यांचे शिरवळ येथे सारोळा पुलावर सकाळी 11.30 वाजता आगमन होणार आहे. तेथे स्वागत झाल्यानंतर 12 वाजता खंडाळा, 12.15 वाजता वेळे, 12.30 वाजता कवठे, 12.35 वाजता भुईंज, 1 वाजता पाचवड, 1.15 वाजता आनेवाडी टोल नाका, 1.30 वाजता सातार्यातील राष्ट्रवादी भवनात महिला आघाडीच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
त्यानंतर 1.45 वाजता पोवई नाका येथे शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, किसनवीर यांच्या पुतळ्यांना ते अभिवादन करण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजता बॉम्बे रेस्टॉरंट येथे स्वागत, 2.15 वाजता अजंठा चौक, देगाव फाटा, 2.30 वाजता अजिंक्यतारा कारखान्यावरील अभयसिंहराजे भोसले पुतळ्यास अभिवादन, 2.45 वाजता नागठाणे, 3 वाजता अतीत, 3.15 वाजता काशीळ, 3.30 वाजता उंब्रज, 3.45 वाजता तासवडे टोल नाका, 4 वाजता कराड येथे कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधी, राजर्षी शाहूंच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर 4.30 वाजता प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवार पेठेत महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन, सायंकाळी 5 वाजता मंगळवार पेठेत बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी पी. डी. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, रॅलीची सांगता होणार आहे.





