Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून
शेंद्रे (ता. सातारा) येथे जुन्या वैमनस्यातून सौरभ बाळू भिसे (वय २९) या युवकाचा डोक्यात (Satara News) खोऱ्याने प्रहार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.

Satara News : शेंद्रे (ता. सातारा) येथे जुन्या वैमनस्यातून सौरभ बाळू भिसे (वय २९) या युवकाचा डोक्यात (Satara News) खोऱ्याने प्रहार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने शेंद्रे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर सातारा तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका संशयितास तात्काळ ताब्यात घेतले.
घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सौरभ भिसे (रा. शेंद्रे) आणि संशयित प्रमोद जाधव यांच्यामध्ये जुन्या उधारीच्या कारणावरून वाद होता. गणेशोत्सावातही त्यावरून बाचाबाची झाली होती. गेल्या आठवडाभरापासून दोघांमध्ये धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे.
शनिवारी भिसे यास उधारी मागितली त्याचा राग येऊन दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी संशयित प्रमोद किसन जाधव याने हातात असलेल्या खोऱ्याने सौरभच्या डोक्यात प्रहार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. भिसे यास मारहाण (Satara News) करताना प्रताप किसन जाधव हा ही त्यात सामील झाला. याच मारहाणीत खोऱ्याचा प्रहार लागून गंभीर जखमी झालेल्या सौरभचा या हल्ल्यात मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सातारा उप विभागाचे पोलिस उप अधिक्षक विपुल पाटील, तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाच्या दृष्टीने आवश्यक पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने संशयिताचा शोध सुरू केला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयितास ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेला संशयित प्रमोद व प्रताप हे दोन्ही भाऊ तारळे (ता. पाटण) येथील मुळ रहिवासी असून, ते शेंद्रे (ता. सातारा) येथे भाड्याने राहत असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
खुनामागील नेमके कारण, गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या वादाचे स्वरूप, हल्ल्यासाठी खोऱ्याचा वापर कशा परिस्थितीत करण्यात आला, तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास (Satara News) सुरू आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संशयिताच्या चौकशीनंतर घटनेमागील अधिक तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.






