Satara News – छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या इतिहासाशी निगडित असलेली ‘मदारी’ हत्तीची समाधी सध्या उपेक्षेच्या गर्तेत सापडली असून तिच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुरुवार बागेसमोरील या ऐतिहासिक स्थळाच्या परिसरात खासगी बिल्डरकडून सुरू असलेल्या बांधकामामुळे इतिहासप्रेमींनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. इतिहास अभ्यासक अरबाज शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मदारी हत्ती शाहू महाराजांचा अत्यंत मानाचा हत्ती होता. मिरवणुकीत मराठा साम्राज्याचा ध्वज वाहून नेणाऱ्या या हत्तीला विशेष प्रतिष्ठा होती. इ. स. 1740 मध्ये गुरुवार बागेजवळील विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शाहू महाराजांनी त्या विहिरीचे अस्तित्व बुजवून त्या ठिकाणी समाधी उभारली. गुरुवार बाग परिसर हा शाहू महाराजांच्या राजवाड्यालगतचा भाग असून तत्कालीन काळात येथे अनेक सरदारांचे वाडे होते. कालांतराने या वाड्यांची पडझड होऊन जागा खासगी मालकीत गेली. मात्र, या प्रक्रियेत ऐतिहासिक वारशाचे संवर्धन पूर्णपणे दुर्लक्षित राहिले आहे. इतिहासप्रेमींच्या मते, ‘आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या नोंदीत या समाधीचा उल्लेख असूनही, स्थानिक प्रशासनाने तिच्या संरक्षणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. परिणामी, या ठिकाणी होत असलेले बांधकाम समाधीच्या रचनेला आणि परिसराला धोका निर्माण करत आहे. स्थानिक नागरिकांनी या समाधीच्या 25 मीटर परिसरात कोणतेही बांधकाम थांबवावे, तसेच सातारा नगरपालिकेने या ठेव्याचे तातडीने दस्तऐवजीकरण करून संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. याबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती अरबाज शेख यांनी दिली.