Satara News | अजिंक्यताऱ्यावर सुरक्षेचा बोजवारा, आत्महत्या रोखणार कोण?

प्रभात वृत्तसेवा
सातारा – आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला पोलिसांनी वाचविल्याच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सातत्याने होणाऱ्या आत्महत्या अथवा आत्महत्येच्या प्रयत्नांचा प्रकार लक्षात घेता पालिकेकडून येथे तैनात केलेली सुरक्षा यंत्रणेची ढिलाई स्पष्ट जाली आहे. मज्जाव करणारी सुरक्षा यंत्रणा सावध नसल्याने ‘आओ जाओ घर तुम्हारा’ प्रकार बोकाळला आहे. सातारा पालिकेने नेमलेले सुरक्षा रक्षक नक्की करतात काय, हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
सातारा शहरातील अनेक नागरिकांचा मॉर्निंग वॉक अजिंक्यतारा किल्ल्याच्या रस्ता आणि किल्ल्यावर होत असतो. गेल्या तीन वर्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकरणातील आठ जणांनी येथे आत्महत्या केली. समर्थनगर येथील युवकाने काल गुरुवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या प्रयत्नाने त्याला रोकले. त्याला ताब्यात घेऊन त्याचे समुपदेशन केले. या घटनेमुळे अजिंक्यतारा किल्ला आणि त्याची सुरक्षितता यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे .
बापटसाहेब, सुरक्षेचे तुम्हीच ठरवा..
सातारा पालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पायाभूत सुविधांचा विकास सुरू आहे. शहराची हद्दवाढ जाहीर होऊन आता पाच वर्षे पूर्ण झाली. अजिंक्यतारा किल्ला गेल्या पाच वर्षापासून शहराच्या हद्दीत समाविष्ट झाला आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने येथे खासगी सुरक्षा रक्षक नेमले. मात्र, किल्ल्यावर या सुरक्षारक्षकांचा आता पत्ता दिसत नाही. मंगळाई देवीकडून किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, विघ्नसंतोषी लोकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या काचा फोडणे, दिव्यांची नासधूस करणे, रस्त्यालगतच्या गटाराची तोडफोड करणे, त्यात माती ओतणे असे उद्योग केल्यामुळे चांगल्या कॅमेऱ्याचे डोळे बंद झाले. किल्ल्याच्या सुरक्षिततेविषयी अधिक सतर्क राहून पालिकेने यावर पुढाकार घेऊन ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जिल्हा नियोजनचीही मदत हवी..
अजिंक्यतारा किल्ल्यावर साताऱ्यातील एका युवतीने मार्च 2025 मध्ये आत्महत्या केली. वर्षभरापूर्वी याच किल्ल्यावर दक्षिण दरवाजाजवळच्या जंगलामध्ये झाडावर एका बिबट्याचा आणि एका युवतीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये इंगळेवाडी नुने येथील तरुणाने आर्थिक विवंचनेतून किल्ल्यावर आत्महत्या केली. ऑगस्ट महिन्यामध्ये शिराळा येथील वैफल्यग्रस्त युवकाने किल्ल्यावरून कुरणेश्वर मंदिराच्या बाजूला उडी मारली होती. या सर्व घटनांवर शहर पोलीस आणि नगरपालिका यांचे विविध उपायोजनांच्या माध्यमातून नियंत्रण आवश्यक आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि सुरक्षिततेसाठी दीर्घकालीन उपायांचा आराखडा बनवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
घोषित निधीची प्रतीक्षा कायम..
जसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने आश्वासक पावले उचलली आहेत. किल्ल्याच्या संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी दोन टप्प्यांमध्ये 50 कोटी रुपये निधीची घोषणा केली होती. यामध्ये किल्ल्यावरील राज सदरेसह इतर इमारती ऐतिहासिक स्वरूपात उभे करण्याचे आव्हान आहे. हा आराखडा अंतिम टप्प्यात असून याकरता निधीची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. निधी आल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे पालिकेच्या सूत्राने स्पष्ट केले.





