Satara News | ‘ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचं’; लोणंदमध्ये मराठा समावेशाला विरोध

प्रभात वृत्तसेवा
लोणंद – मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यास आम्हाला कोणताही विरोध नाही. पण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अशी ठाम भूमिका ओबीसी समाजबांधवांनी व्यक्त केली आहे. ओबीसी वर्गामध्ये आधीच अनेक लहान जातींचे लोक अत्यंत गरीब असून, त्यांच्यापर्यंत सध्याचे आरक्षणसुद्धा व्यवस्थित पोहोचत नाही.
अशा परिस्थितीत लोकसंख्येने मोठा असलेला मराठा समाज ओबीसीमध्ये समाविष्ट झाल्यास, आमच्या गरीब जातींना आरक्षणाचा कुठलाही लाभ मिळणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.या मागणीसाठी गुरुवार, दि. ४ सप्टेंबर २०२५ पासून लोणंद नगरपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे. शासनाने हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा व आमचे आरक्षण अबाधित ठेवावे, अशी नम्र विनंती उपोषणकर्त्यांनी केली आहे.
साखळी उपोषणाला संजय जाधव, अनिल कुदळे, संतोष मुसळे, शकील मणेर, अशोक शेळके, सुनिल कुचेकर हे बसले आहेत. लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व संपूर्ण परिसरात बंदोबस्त ठेवला आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील शेळके, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी, नगरसेवक रवींद्र क्षीरसागर, भरत बोडरे, ॲड. गजेंद्र मुसळे, बंडा क्षीरसागर, हर्षवर्धन शेळके, तेजस क्षीरसागर, शंकरराव मर्दाने, किशोर पवार, दादासाहेब रणदिवे, सुनील खरात, सागर खरात यांनी उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित राहून उपोषणकर्त्यांना पाठिंबा जाहीर केला.





