PCMC News: पालिका आयुक्तांचा दणका! २७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; ‘या’ एकाच निर्णयाने अनेकांच्या खुर्च्या हलल्या
PCMC News: गेल्या अनेक वर्षांपासून एकाच विभागात नियमबाह्य कामे करणाऱ्यांना दणका; लाडक्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या टाळल्याने पालिका वर्तुळात उलट-सुलट चर्चा.

PCMC News – अनेक दिवसांपासून रखडलेल्या महापालिकेच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून एकाच वेळी २७२ कर्मचाऱ्यांच्या विभागातंर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. गेल्या काही वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना देखील बदल्यांमुळे आपला आवडता विभाग सोडावा लागणार आहे.
जनगणनेच्या कामामुळे रखडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. दरम्यान प्रत्येक बदली वेळी होणारे भेदभावाचे आरोप यंदाही होत असून राजकीय पदाधिका-यांच्या जवळच्या कर्मचा-यांना चांगले विभाग देण्यात आल्याची कुजबूज सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये अनेक कर्मचारी एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले हाेते. कर्मचारी एकाच विभागात ठाण मांडून बसल्यामुळे कर्मचारी मनमर्जीप्रमाणे काम करतात.
तसेच अनेक कामे केली जात नाहीत आणि काही कामे नियमाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन केली जातात. त्यामुळे दरवर्षी महापालिकेत मे अखेर विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. मात्र, यावेळी मे महिन्यामध्ये बदल्या झाल्या नाहीत. जानेवारीमध्ये महापालिकेची निवडणूक झाली. त्यानंतर मार्चमध्ये डाॅ. विजय सूर्यवंशी आयुक्त म्हणून रुजू झाले. तेव्हापासून महापालिकेतील कर्मचा-यांच्या बदल्या हाेणार असल्याची चर्चा हाेती.
मात्र, जनगणनेच्या कामामध्ये अनेक कर्मचारी गुंतले हाेते. त्यामुळे बदल्या रखडल्या हाेत्या. अखेर आयुक्त डाॅ. सूर्यवंशी यांनी शुक्रवारी (दि.19) रात्री 272 कर्मचा-यांच्या बदल्याचे आदेश जारी केले. यात एका पदाधिकाऱ्याचा जवळ समजला जाणारा एक कर्मचारी मात्र गेली दहा वर्षे एकाच विभागात काम करत आहे, त्यांची बदली न झाल्याची चर्चा रंगली आहे.
कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदावरील 75, स्थापत्य विभागाचे 36 उप अभियंता, 103 लिपिक, 58 मुख्य लिपिक अशा 272 कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, या बदल्यांमध्ये राजकीय पदाधिका-यांनी माेठा हस्तक्षेप केल्याचे दिसून येत आहे. पदाधिका-यांनी आपल्या मर्जीतील कर्मचा-यांना चांगले विभाग देण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे बदल्यामध्ये भेदभाव झाल्याचा आराेप कर्मचा-यांमधून केला जावू लागला आहे.






